

OpenAI to launch new smart web browser challenge to Google chrome
सॅन फ्रान्सिस्को : कृत्रिम बुद्धिमत्तेतील आघाडीची कंपनी OpenAI लवकरच आपला स्वतःचा AI-सक्षम वेब ब्राऊजर बाजारात आणण्याच्या तयारीत आहे. हा ब्राऊजर Google Chrome या सध्या आघाडीच्या ब्राऊजरला थेट आव्हान देईल, अशी माहिती Reutersने दिली आहे.
OpenAI चे ब्राऊजर येत्या काही आठवड्यांत लाँच होण्याची शक्यता आहे. कंपनीचा उद्देश वेब ब्राऊझिंगचा पारंपरिक पद्धतीने पुनर्रचना करणे हा आहे. या ब्राऊजरच्या माध्यमातून OpenAI ला वापरकर्त्यांची अधिक थेट माहिती मिळू शकणार आहे, जी Alphabet च्या जाहिरात महसूलासाठी एक महत्त्वाचा घटक आहे.
सध्या ChatGPT चे 50 कोटी साप्ताहिक सक्रिय वापरकर्ते आहेत. जर यापैकी बहुसंख्य वापरकर्ते OpenAI चा नवीन ब्राऊजर वापरू लागले, तर Google साठी हे एक मोठे धोक्याचे कारण ठरू शकते. Chrome च्या माध्यमातून Google आपल्या जाहिरात यंत्रणेसाठी महत्त्वाचा युजर्स डाटा गोळा करतो व ती वापरून नफा कमावतो.
या नव्या ब्राऊजरमध्ये पारंपरिक वेबपेजऐवजी ChatGPT सारखा संवादात्मक इंटरफेस वापरकर्त्यांना अनुभवायला मिळणार आहे.
म्हणजेच वापरकर्ता वेबसाइट्सवर क्लिक करण्याऐवजी थेट चॅटद्वारे आवश्यक माहिती मिळवू शकणार.
शिवाय, हे ब्राऊजर वापरकर्त्याच्या वतीने फॉर्म भरणे, रिझर्वेशन करणे यासारख्या गोष्टी स्वयंचलितपणे करू शकेल.
Google Chrome सध्या जगभरात सुमारे 3 अब्ज वापरकर्त्यांच्या सहाय्याने 65 टक्क्यांपेक्षा जास्त मार्केट शेअर ठेवून आहे. त्यामुळे OpenAI साठी ही स्पर्धा सोपी नसेल. पण AI-आधारित ब्राऊजरद्वारे OpenAI बाजारात नवे क्रांतिकारी बदल घडवू पाहत आहे.
OpenAI चा ब्राऊजर Google च्या Chromium या ओपन-सोर्स ब्राऊजर कोडवर आधारित असणार आहे. हेच कोड Chrome, Microsoft Edge, Opera यांसारख्या ब्राऊजर्ससाठीही वापरले जाते. विशेष म्हणजे, OpenAI ने Google Chrome तयार करणाऱ्या मूळ टीममधील दोन वरिष्ठ उपाध्यक्षांची नुकतीच नियुक्ती केली आहे.
OpenAI ने अन्य कोणत्याही ब्राऊजरवर फक्त 'प्लगइन' विकसित करण्याऐवजी स्वतःचा स्वतंत्र ब्राऊजर तयार करण्याचा निर्णय घेतला. यामुळे OpenAI ला वापरकर्त्याच्या डेटा संकलनावर अधिक नियंत्रण मिळू शकणार आहे, अशी माहिती एका संबंधित व्यक्तीने दिली.
AI ब्राऊजरच्या क्षेत्रात सध्या Perplexity, The Browser Company आणि Brave सारख्या स्टार्टअप्सनीही आपापले ब्राऊजर्स सादर केले आहेत. विशेषतः 'Comet' नावाचा AI ब्राऊजर नुकताच Perplexity कडून सादर करण्यात आला आहे.
नव्या युगाची सुरुवात...
OpenAI च्या या नव्या उपक्रमामुळे ब्राऊझिंगचा अनुभव पूर्णपणे बदलू शकतो. वापरकर्त्यांना केवळ माहिती मिळवण्यापुरतेच नव्हे, तर विविध कामे करून घेण्यासाठी AI सहायक देखील तयार असतील. यामुळे पारंपरिक सर्च इंजिन आणि जाहिरात आधारीत मॉडेलवर मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.