Pakistan Army Chief Asim Munir on Kashmir
कराची : भारताने ऑपरेशन सिंदूरमधून पाकिस्तानची हालत खराब केल्यावरही पाकिस्तानी सैन्याची युद्धाची खुमखुमी पुन्हा पुन्हा उफाळून वर येत असते. नुकतेच पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांनी पुन्हा एकदा भारतविरोधात जहरी वक्तव्य करत काश्मीरचा मुद्दा उकरला आहे.
कराचीत नेव्हल अकॅडमीमध्ये झालेल्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी, भारताने दोन वेळा 'अकारण आक्रमण' केल्याचा आरोप करत, भविष्यात भारताच्या कुठल्याही कृतीला "ठोस व निर्णायक उत्तर" देण्याचा इशारा दिला.
मुनीर यांनी 22 एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा संदर्भ देत भारतालाच दोषी ठरवलं. त्यांनी दावा केला की, "भारताने विनाकारण आक्रमण केलं आणि त्यामागे दूरदृष्टीचा अभाव होता."
भारताच्या ऑपरेशन सिंदूरच्या कारवाईविषयी बोलताना असीम मुनीर म्हणाले की, "पाकिस्तानने संयम दाखवत शांतता राखण्याचा प्रयत्न केला आणि आम्ही प्रादेशिक स्थैर्यासाठी एक सकारात्मक भूमिका निभावत आहोत.
दरम्यान, त्यांनी काश्मीरला पाकिस्तानची jugular vein आहे, असे संबोधून, त्यावर "संयुक्त राष्ट्रांच्या ठरावांनुसार आणि काश्मिरी जनतेच्या आकांक्षेनुसार" तोडगा निघावा, अशी मागणी केली. एकप्रकारे काश्मीर हा पाकिस्तानच्या गळ्यातील ताईत आहे असेच मुनीर म्हटले आहेत.
मुनीर यांनी आपल्या भाषणात, काश्मीरमधील हिंसक हालचालींना 'न्याय्य संघर्ष' म्हणत अप्रत्यक्षपणे दहशतीला पाठिंबा दिला. त्यांनी स्पष्ट शब्दांत न सांगता, भारतातील घटनांबाबत दहशतवादी हल्ल्यांचं समर्थन केल्यासारखं वाटतं.
दरम्यान, पाक लष्करप्रमुखाच्या अशा वक्तव्यांमुळे प्रादेशिक शांततेस धोका निर्माण होऊ शकतो. काश्मीरच्या मुद्द्यावरून आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर सहानुभूती मिळवण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न सातत्याने अपयशी ठरत आहे.
भारताकडून होणाऱ्या प्रत्युत्तर कारवाईनंतरही, पाकिस्तानने आक्रमक भूमिका घेणं हे त्यांच्या अंतर्गत असुरक्षिततेचे द्योतक मानले जात आहे.
भारत सरकारने आधीच स्पष्ट केलं आहे की, दहशतवादाबाबत कोणतीही तडजोड होणार नाही. पंतप्रधानांनी आणि संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या प्रतिक्रियांमध्ये स्पष्ट झालं की, जर पाकिस्तानकडून पुन्हा अशा प्रकारची कुरापत काढली गेली, तर त्याला अजून कठोर प्रत्युत्तर दिले जाईल.
पहलगाम हल्ल्याला भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर हवाई हल्ले करत जोरदार प्रत्युत्तर दिलं. या कारवाईत भारताने जैश-ए-मोहम्मदचे वरिष्ठ कमांडर अब्दुल रऊफ अझहर यासह 100 हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केला.
पाकिस्तानचे अनेक लष्करी तळही उद्ध्वस्त झाले. हे हल्ले 10 मे पर्यंत सुरू होते, त्यानंतर पाकिस्ताननेच मोठ्या नुकसानीमुळे युद्धविरामाची मागणी केली.