

Operation Sindoor
पाकिस्तानच्या एचक्यू-९ एअर डिफेन्स मिसाईल लाँचर्सच्या एअर डिफेन्स युनिट्सचे मोठे नुकसान झाले आहे. याबाबतचे वृत्त ANI वृत्तसंस्थेने दिले आहे. ही मूळ चीनची जमिनीवरून हवेत मारा करणारी लांब पल्ल्याची क्षेपणास्त्र प्रणाली आहे. जी पाकिस्तानच्या संरक्षण नेटवर्कचा एक महत्त्वाचा भाग मानली जाते.
वृत्तानुसार, ड्रोन हल्ल्यांत पाकिस्तानी हवाई संरक्षण दलाच्या प्रणालीचे मोठे नुकसान झाले आहे. पाकिस्तान चीनच्या हवाई संरक्षण प्रणालीचा वापर करतो. त्यांची ८० टक्क्यांहून अधिक शस्त्रे चिनी बनावटीची आहेत.
भारतीय सैन्याने 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर (PoJK) मध्ये एअर स्ट्राईक करुन ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केल्यानंतर ही घटना समोर आली आहे.
दरम्यान, दुसऱ्या एका कारवाईत भारतीय हवाई दलाच्या एस-४०० सुदर्शन चक्र हवाई संरक्षण क्षेपणास्त्र प्रणालीने काल रात्री भारताच्या दिशेने येणारे हल्ले निष्प्रभ केले.
भारतीय सैन्याने मंगळवारी मध्यरात्री ऑपरेशन सिंदूर सुरु केले. या अंतर्गत हल्ला करत पाकिस्तानमधील ९ दहशतवादी ठिकाणे उद्ध्वस्त केली. दरम्यान, पाकिस्तानने भारतातील १५ लष्करी ठिकाणांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्यानंतर सशस्त्र दलांनी गुरुवारी पाकिस्तानमधील अनेक ठिकाणी हवाई संरक्षण रडारना लक्ष्य केले. त्यात पाकिस्तानची लाहोरमधील हवाई संरक्षण प्रणाली नष्ट झाली आहे. चीनने विकसित केलेल्या HQ-9 क्षेपणास्त्र संरक्षण प्रणालीच्या युनिट्सवर हल्ला करण्यात आला. यात लाहोरमधील पाकिस्तानची संरक्षण प्रणाली पूर्णपणे उद्ध्वस्त झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
पहलगाम हल्ल्याचा बदला म्हणून भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर अचूक हल्ले केले. यात १०० दहशतवाद्यांचा खात्मा केल्याची माहिती संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी आजच्या सर्वपक्षीय बैठकीत दिली. दरम्यान, या बैठकीनंतर केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांनी ऑपरेशन सिंदूर अद्याप सुरू असल्याचे स्पष्ट केले.