Action against Pakistanis in India
पुढारी ऑनलाईन : जम्मू -काश्मीरमधील पहलगाम येथे काही दिवसांपूर्वीच दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात २६ पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला. आता या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरुद्ध कडक कारवाई केली आहे. ज्यामध्ये भारतात असलेल्या पाकिस्तानी नागरिकांना भारताने देश सोडण्याचे निर्देश दिले होते.
भारत सोडण्याचे निर्देश दिल्यानंतर काही पाकिस्तानी नागरिकांनी देश सोडला आहे. तर काही नागरिकांना एक - दोन दिवसात परत पाठवले जाईल. जे पाकिस्तानी नागरिक या नियमांचे पालन करणार नाहीत त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जे पाकिस्तानी नागरिक भारत सरकारने ठरवलेल्या वेळेत देश सोडणार नाहीत त्या नागरिकांना अटक करण्यात येईल. त्यांच्यावर खटला चालवला जाऊन यामध्ये त्यांना तीन वर्षापर्यंत तुरुंगवास किंवा ३ लाख रुपयांपर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.
सार्क व्हिसा धारकांना भारत सोडण्याची अंतिम तारीख २६ एप्रिल होती. वैद्यकीय व्हिसा धारकांसाठी ही अंतिम तारीख २९ एप्रिल आहे.
४ एप्रिल रोजी लागू झालेल्या इमिग्रेशन अँड फॉरेनर्स अॅक्ट २०२५ नुसार, मुदतवाढीनंतर राहणे, व्हिसा अटींचे उल्लंघन करणे किंवा प्रतिबंधित क्षेत्रात अनधिकृत प्रवेश केल्यास तीन वर्षांचा तुरुंगवास आणि ३ लाख रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो.
इमिग्रेशन अँड फॉरेनर्स अॅक्ट २०२५ नुसार 'जो कोणी परदेशी असेल त्याला व्हिसा देण्यात आलेल्या कालावधीपेक्षा जास्त काळ भारताच्या कोणत्याही प्रदेशात राहतो किंवा या कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन करून वैध पासपोर्ट किंवा इतर वैध प्रवास दस्तऐवजाशिवाय भारतात राहतो आणि राहण्यासाठी त्याला देण्यात आलेल्या वैध व्हिसाच्या अटींचे उल्लंघन करणारे कोणतेही कृत्य करतो' त्या व्यक्तीला या कायद्यान्वये शिक्षा होऊ शकते.
या कायद्यान्वये दिलेला कोणताही नियम किंवा आदेश किंवा या कायद्याच्या अनुषंगाने दिलेला कोणताही निर्देश किंवा सूचना तसेच या कायद्याच्या इतर कोणत्याही तरतुदींचे उल्लंघन केल्यास, तीन वर्षांपर्यंत कारावास किंवा तीन लाख रुपयांपर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शुक्रवार (दि. २५) रोजी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन करून पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्याचे निर्देश देण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यांनी देश सोडण्यासाठी निश्चित केलेल्या अंतिम मुदतीनंतर कोणताही पाकिस्तानी नागरिक भारतात राहू नये याची खात्री करण्यास सांगितले.