

Operation Sindoor |
दिल्ली : ऑपरेशन सिंदूर अंतर्गत, भारतीय सैन्याने अवघ्या २५ मिनिटांत अचूक हल्ला केला आणि लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनांच्या मुख्यालयासह नऊ दहशतवादी प्रशिक्षण केंद्रे उद्ध्वस्त केली. हल्ल्यानंतर सरकारने आज सकाळी ११ वाजता सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे. गृहमंत्री अमित शहा आणि संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू हे देखील बैठकीला उपस्थित राहतील. या बैठकीत विरोधी नेत्यांना हल्ल्याबद्दल माहिती भविष्यातील रणनीती बद्दल माहिती दिली जाणार आहे.
दरम्यान, काँग्रेसचे नेते जयराम रमेश म्हणाले की, आम्ही पंतप्रधानांना २४ एप्रिल रोजी होणाऱ्या बैठकीला उपस्थित राहण्यास सांगितले होते, परंतु ते आले नाहीत. निदान यावेळी तरी ते यायला हवेत. पाकिस्तान आणि पीओकेमधून येणाऱ्या सर्व प्रकारच्या दहशतवादाविरुद्ध भारताचे राष्ट्रीय धोरण स्पष्ट आणि मजबूत असल्याचे ते म्हणाले. राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी या बैठकीला उपस्थित राहणार असल्याचे रमेश यांनी सांगितले.
दहशतवादाविरुद्ध सरकारला पूर्ण पाठिंबा आणि लष्कराशी एकता दर्शवत काँग्रेसने 'संविधान वाचवा रॅली'सह पक्षाचे सर्व नियोजित कार्यक्रम थांबवले आहेत.
ऑपरेशन सिंदूरनंतर, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी नियंत्रण रेषेवरील पाकिस्तानी सैन्याच्या कारवायांबाबत स्थानिक दलांशी सतत संपर्कात आहेत. पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीर (पीओजेके) मधील दहशतवादी लाँच पॅडवर केलेल्या अचूक हल्ल्यांनंतर पाकिस्तानकडून होणाऱ्या शस्त्रसंधी उल्लंघनांवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. पाकिस्तानच्या कोणत्याही संभाव्य चुकीच्या कृतीसाठी लष्कर आणि सुरक्षा दल हाय अलर्टवर असल्याचे संरक्षण अधिकाऱ्यांनी बुधवारी सांगितले.