

Operation Sindoor
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेत भारताने आज पहाटे पाकिस्तानमधील ९ दहशतवादी तळांवर हल्ला केला. या धडक कारवाईने पाकिस्तानची झोड उडाली आहे. ऑपरेशन सिंदूरने धडकी भरल्यामुळे पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ आता शुद्धीवर आले आहेत. भारताच्या कारवाईबाबत प्रतिक्रिया देताना त्यांनी नरमाईची भूमिका घेतली आहे.
भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी छावण्यांवर लष्करी कारवाई केल्यानंतर काही तासांतच 'ब्लूमबर्ग' टीव्हीशी बोलताना संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले की, भारताने तणाव कमी केला तर पाकिस्तानही तणाव कमी करण्यास तयार आहे. आम्ही गेल्या पंधरवड्यापासून सतत सांगत आहोत की आम्ही कधीही भारताविरुद्ध कोणतेही शत्रुत्वाचे पाऊल उचलणार नाही; परंतु जर आमच्यावर हल्ला झाला तर आम्ही प्रत्युत्तर देऊ.' जर भारताने माघार घेतली तर आपण निश्चितच हा तणाव कमी करू.
भारताने केलेल्या हवाई हल्ल्याबाबत माहिती देताना पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ चौधरी यांनी सांगितले की, भारताच्या क्षेपणास्त्र हल्ल्यात किमान २६ जण ठार आणि ४६ जण जखमी झाले आहेत. दरम्यान, भारताने पाकिस्तानमधील दहशतवादी अड्ड्यांवरच हल्ला केला आहे. त्यांनी कोणत्याही निवासी क्षेत्रांवर किंवा नागरिकांच्या वस्ती असलेल्या ठिकाणी हल्ला केलेला नाही, असे भारताने स्पष्ट केले आहे.
पंतप्रधान शाहबाज शरीफ म्हणाले की, पाकिस्तानच्या सशस्त्र दलांना शत्रूशी कसे सामोरे जायचे हे चांगले माहित आहे. भारताने केलेल्या युद्धाच्या कृत्याला योग्य उत्तर देण्याचा पाकिस्तानला पूर्ण अधिकार आहे. खरं तर, याला तीव्र प्रतिसाद मिळत आहे. आम्ही त्यांच्या वाईट हेतूंमध्ये कधीही यशस्वी होऊ देणार नाही. मात्र यानंतर काही वेळातच पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांच्या विधानावरून हे स्पष्ट झाले की पाकिस्तानचे नेहमीचे पंतप्रधान फक्त पोकळ धमक्या देत होते.
पहलगाम हल्ल्याचा बदला म्हणून भारताने 'ऑपरेशन सिंदूर'द्वारे पाकिस्तानमधील ९ दहशतवादी ठिकाणांवर मध्यरात्री हल्ला केला. हे ऑपरेशन सुरू केल्यानंतर काही तासांतच, चीनने यावर प्रतिक्रिया दिली आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी भारत- पाकिस्तानमधील तणावाच्या परिस्थितीवर चिंता व्यक्त केली आहे. दोन्ही देशांनी शांतता आणि स्थिरतेसाठी भूमिका घ्यावी. तसेच शांतता आणि संयम राखावा आणि परिस्थिती आणखी गुंतागुंतीची होऊ नये, याची काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.