

Sam Altman On AI Jobs : मागील दोन-तीन वर्षांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेची (AI) प्रगती सर्वांनाच अचंबित करणारी ठरली आहे. तसेच AI अनेक नोकर्या नोकऱ्या हिसकावून घेणार, अशी चर्चेही वेगावली आहे. आता AIमुळे किती टक्के नोकर्या कमी होणार? याचे भाकित थेट ओपनएआयचे (OpenAI) सीईओ सॅम ऑल्टमन यांनीच केले आहे. त्यांचा अंदाज हा अनेकांना धडकी भरवणारा ठरणारा आहे.
‘ॲक्सेल स्प्रिंगर पुरस्कार’ स्वीकारल्यानंतर बोलताना ऑल्टमन यांनी सांगितले की, एआयचा विकास इतक्या वेगाने होत आहे की, लवकरच यंत्रे मानवी बुद्धिमत्तेला मागे टाकतील. आतापर्यंत हे फक्त विज्ञान-कथांमध्येच शक्य वाटत होते. अनेक बाबतीत, GPT-5 माझ्यापेक्षा अधिक हुशार आहे. मला वाटते की, इतरांपेक्षाही तो पुढे आहे. काही साध्या गोष्टींमध्ये अजूनही एआयला अडचणी येत असल्या तरी, त्याची प्रगती अत्यंत वेगाने होत आहे.
ऑल्टमन यांच्या मते, लवकरच एआय मानवी बुद्धिमत्तेला न शकणाऱ्या गोष्टींचा शोध लावू शकेल. पुढील काही वर्षांत, एआय मानवाद्वारे शक्य नसलेल्या वैज्ञानिक शोधांना जन्म देईल. तेव्हा आपल्याला ‘सुपरइंटेलिजन्स’ची (परम-बुद्धिमत्ता) जाणीव होईल. 2030 पर्यंत, जर आपण स्वतःहून करू शकत नसलेल्या गोष्टी करणारी एआय मॉडेल्स तयार झाली नाहीत तर मला खूप आश्चर्य वाटेल. हा एक प्रकारचा ‘सुवर्णकाळ’ असला तरी, त्यामुळे मोठ्या प्रमाणात नोकऱ्या जातील, अशी चिंताही त्यांनी व्यक्त केली.
ऑल्टमन यांनी स्पष्ट केले की, तंत्रज्ञानाने नेहमीच कामाचे स्वरूप बदलले आहे; पण यावेळी हा बदल अधिक वेगाने होईल. नोकऱ्या पूर्णपणे नष्ट होणार नाहीत, तर त्यामधील कामे स्वयंचलित होतील. नजीकच्या भविष्यात अर्थव्यवस्थेतील 30 ते 40 टक्के कामे एआयद्वारे होतील. काही नोकऱ्या पूर्णपणे नाहीशा होतील, तर नव्या प्रकारची कामे उदयास येतील. त्यामुळे बदलत्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेण्याची ‘शिकण्याची कला’ विकसित करणे महत्त्वाचे आहे.
एआय मानवी अस्तित्वच संपवून टाकेल, या चर्चेबाबत बोलताना ऑल्टमन यांनी ओपनएआयचे सह-संस्थापक इल्या सुत्स्केव्हर यांचा हवाला देत सांगितले की, "एजीआय (AGI - General Artificial Intelligence) मानवांना ‘प्रेमळ पालकांप्रमाणे’ वागवेल अशी त्यांना आशा आहे. एआय एक शक्तिशाली साधन आहे, पण त्याला कोणतीही भावना किंवा हेतु नाही. जर त्याला मानवी मूल्यांशी जोडले नाही, तर त्याचे अनपेक्षित परिणाम होऊ शकतात. जरी एआयचा कोणताही वाईट हेतु नसला तरी, त्याला काही काम सांगितल्यास त्याचे परिणाम आपण समजू शकणार नाही. म्हणूनच त्याला मानवी मूल्यांशी जोडणे खूप महत्त्वाचे आहे," असेही त्यांनी स्पष्ट केले.
ऑल्टमन यांनी ओपनएआयच्या हार्डवेअरच्या भविष्यातील उपक्रमाची माहिती देताना सांगितले की, कंपनीने नुकतेच ॲपलच्या एका डिझाइनरची नियुक्ती केली आहे. ही उपकरणे भविष्यात संगणकाचा वापर करण्याची पद्धत बदलू शकतात. एआय हा माऊस-कीबोर्ड आणि टचस्क्रीन क्रांतीनंतर संगणक क्षेत्रातला तिसरा मोठा बदल ठरेल. यामुळे लोक ॲप्स आणि नोटिफिकेशन्सच्या गर्दीतून बाहेर पडून एकाच वेळी अनेक कामे करू शकतील, असा विश्वासही सॅम ऑल्टमन यांनी यावेळी व्यक्त केला.
एआयचा राजकारणावर काय परिणाम होईल, यावर बोलताना ऑल्टमन म्हणाले, लवकरच एआय अध्यक्ष होईल, अशी कोणतीही शक्यता नाही;, पण जगभरातील नेते निर्णय घेण्यासाठी एआयवर अधिक अवलंबून राहतील. तसेच नात्यांमधील सल्ल्यासाठी एआयचा वापर करता येईल का, या प्रश्नावर मात्र त्यांनी हसून सांगितले की, "मी प्रयत्न केला आहे, पण माझ्यासाठी तरी ते फारसे उपयोगी नाही."