Ocean Biodiversity-World Ocean Day 2025 |
नवी दिल्ली : हवामान बदल, प्रदूषण आणि अतिमासेमारीमुळे महासागरातील जैवविविधता धोक्यात आल्याचे मरीन स्टीवर्डशिप कौन्सिल (एमएससी) च्या सर्वेक्षण अहवालातून समोर आले आहे. ८ जून रोजी जागतिक महासागर दिन आणि ९ ते १३ जून रोजी होणाऱ्या संयुक्त राष्ट्र महासागर परिषदेच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या या सर्वेक्षणात भारतासह १९ देशांतील ५८ आघाडीच्या महासागर तज्ञांनी सहभाग घेतला होता.
हवामान बदल हा महासागराच्या आरोग्यासाठी आणि जैवविविधतेसाठी सर्वात मोठा धोका आहे, असे बहुतेक शास्त्रज्ञांचे मत आहे. महासागराच्या तापमानात वाढ, समुद्राच्या पातळीत वाढ, प्रवाहांमध्ये आणि हवामानाच्या पद्धतींमध्ये बदलांसह इतर अनेक परिणाम होत आहेत. सागरी प्रदूषण, अतिमासेमारी आणि सागरी अधिवासातील बदल देखील मोठ्या परिणामकराक घटकांपैकी आहेत, हे सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे.
एमएससी ही एक आंतरराष्ट्रीय ना-नफा संस्था आहे. जगभरातील ७०० हून अधिक मत्स्यव्यवसायांसोबत काम करते, जी शाश्वत मासेमारी आणि सीफूड पुरवठा साखळीसाठी जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त मानके निश्चित करते. सर्वेक्षणात सहभागी झालेल्या भारतीय शास्त्रज्ञांनी सांगितले की, समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान वाढत आहे. त्यामुळे चक्रीवादळासह तीव्र हवामान घटनांची वारंवारता वाढली आहे. यामुळे सागरी अन्नसाखळी विस्कळीत झाली असून किनारी उपजीविकेत व्यत्यय येत आहे.
हवामान परिणामांबद्दल, सस्टेनेबल सीफूड नेटवर्क ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि सेंट्रल मरीन फिशरीज रिसर्च इन्स्टिट्यूट (CMFRI) चे माजी प्रमुख शास्त्रज्ञ सुनील मोहम्मद यांनी सांगितले, “हिंद महासागराचे तापमान वाढत आहे. यामुळे माशांची उत्पादकता, प्रजातींचे वितरण आणि काही व्यावसायिकदृष्ट्या महत्त्वाच्या माशांच्या जातींमध्ये घट होत आहे.”
भारतात प्लास्टिक प्रदूषण हे सागरी परिसंस्थांसाठी सर्वात मोठा धोका असल्याचे समोर आले आहे. मानवी कृतींमधून जमिनीवरील प्लास्टिक महासागरांपर्यंत पोहोचत आहे. या प्लास्टिकचा किनारी परिसंस्था आणि लहान मासेमारी व्यवसायांना गंभीर धोका निर्माण होत असल्याचा इशारा शास्त्रज्ञांनी दिला आहे.
या धोकादायक परिस्थीतीतही शास्त्रज्ञ आशावादी आहेत. त्यांनी महासागरांचे संरक्षण करण्यासाठी विज्ञान आणि धोरणातील प्रगती या साधनांसह जागतिक करार आणि वचनबद्धतेची उदाहरणे दिली आहेत. ज्यामुळे महासागरातील जैवविविधतेचे भविष्यातील नुकसानीपासून संरक्षण केले जाऊ शकते.
भारताकडून एम.के. सजीवन (केरळ मत्स विद्यापीठ) आणि एस. साबू (कोचीन विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्यापीठ) हे या सर्वेक्षणात सहभागी झाले होते. जागतिक महासागर दिनापूर्वी, 'Pre-serving ocean life: How sus-tainable fishing supports biodiversity' हा अहवाल प्रसिद्ध केला. ज्यामध्ये मच्छीमार तंत्रज्ञान, उपकरणे आणि विविध तंत्रांचा वापर करून महासागरातील जैवविविधतेवर होणारा परिणाम कमी करण्यासाठी आणि भविष्यातील पिढ्यांसाठी सागरी जीवनाचे संरक्षण करण्यासाठी सकारात्मक केस स्टडीजचा एक संग्रह अधोरेखित केला आहे.