

North Korea Power Struggle: उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन हे आपल्या अवघ्या १३ वर्षाच्या मुलीला किम जू आय हिला आपला उत्तराधिकारी म्हणून घोषित करण्याची शक्यता आहे. मात्र किम जोंग यांच्या निर्णयामुळं उत्तर कोरियात सत्ता संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे. या १३ वर्षाच्या मुलीविरूद्ध तिची आत्या कीम यो जोंग शड्डू ठोकण्याची शक्यता आहे.
उत्तर कोरियाचा सख्खा शेजारी आणि पक्का वैरी असलेला देश म्हणजे दक्षिण कोरिया! उत्तर कोरियात काय सुरू आहे याची अचूक माहिती दक्षिण कोरियाचे एनआयएस अर्थात नॅशनल इंटेलिजन्स सर्व्हिसेसला असते. त्यांनी गेल्या आठवड्यातच उत्तर कोरियाची पुढची उत्तराधिकारी ही १३ वर्षाची किम यू आय होण्याची शक्यता वर्तवली होती. उत्तर कोरियात या महिन्यात मोठी राजकीय कॉन्फरन्स होणार आहे. त्यावेळी किम जोंग उन हे आपली पकड मजबूत करण्यासाठी काही मोठी ध्येय धोरणे जाहीर करण्याची शक्यता आहे.
बंद दाराआड होणाऱ्या या राजकीय कॉन्फरन्समध्ये किम जू आय आपल्या वडिलांसोबत पक्षाच्या काँग्रेसमध्ये येतात का याकडे एनआयएसचे लक्ष आहे.
किंम जू आय या सर्वात पहिल्यांदा २०२२ मध्ये लाँग रेंज मिसाईलच्या चाचणीवेळी सार्वजनिक ठिकाणी दिसल्या होत्या. त्यानंतर त्या अनेकवेळा आपल्या वडिलांसोबत सार्वजनिक कार्यक्रमात दिसल्या आहेत. यात शस्त्र चाचणी आणि लष्करी परेड यांचा समावेश आहे. त्यांनी वडिलांसोबत गेल्या सप्टेंबर महिन्यात चीनचा दौरा देखील केला होता.
यापूर्वीच सेऊलमधील अधिकाऱ्यांना या मुलीची उत्तर कोरियाची पुढची नेता म्हणून निवड केली जाईल याबाबत शंका होती. कारण उत्तर कोरियात नेतृत्वाच्या बाबतीत पुरूषांचा दबदबा जास्त आहे. मात्र किम जू आय यांचे सतत सार्वजनिक ठिकाणी दिसणे यामुळं त्यांना आपल्या या थिअरीबाबत पुन्हा विचार करावा लागत आहे. एनआयएसच्या अधिकाऱ्यांनी चीन किम जू आय यांना त्या उत्तराधिकारी आहेत हे नॅरेटिव्ह सेट करण्यासाठी मदत करत असल्याचा देखील संशय आहे.
किम जू आय यांच्या भविष्यातील उत्तराधिकारी पदाला तिची आत्याच आव्हान देऊ शकते. किम जोंग उन यांची बहीण किम यो जोंग या उत्तर कोरियातील उन यांच्यानंतरच्या दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वत प्रभावशाली राजकीय व्यक्ती आहेत. त्यांना राजकीय तसेच लष्करी अधिकाऱ्यांचे देखील पाठबळ आहे.
किंम जो योंग या सध्याच्या घडीला वर्कर्स पार्टी ऑफ कोरियाच्या केंद्रीय समितीत वरिष्ठ पदावर आहेत. त्यांच्या त्यांच्या भावावर चांगला प्रभाव असल्याचं देखील सांगण्यात येतं.
दक्षिण कोरिया इंटेलिजन्समधील वरिष्ठ अधिकाऱ्याने जर किम जोंग उन यांनी आपला उत्तराधिकारी म्हणून आपल्या १३ वर्षाच्या मुलीची निवड केली तर भविष्यात या मुलीमध्ये आणि तिची आत्या किंम यो जोंग यांच्यात सत्तासंघर्ष निर्माण होऊ शकतो. न्यूयॉर्क पोस्टने किंम यो जोंग यांच्याकडे आपल्या राजकीय महत्वकांक्षा बाजूला ठेवण्याचं असं कोणतंही कारण सध्या तरी दिसत नाही असं म्हटलं आहे.
दक्षिण कोरिया इंटेलिजन्समधील वरिष्ठ अधिकारी राह म्हणतात की, 'सर्व काही वेळेवर अवलंबून आहे. मात्र मला विश्वास आहे की किम यो जोंग यांना देशाचं सर्वोच्च पद मिळवण्याची संधी असेल तर त्या नक्कीच त्यासाठी प्रयत्न करतील. असं न करण्याचं त्यांच्याकडे कोणतच कारण नाही.
उत्तर कोरियात टोकाचा सत्ता संघर्ष आणि कौटुंबिक संघर्ष झाला आहे. २०११ मध्ये किम जोंग उन यांनी आपल्या काकाच्या विरोधात जाऊन सत्ता मिळवली आहे. काका जँग साँग थीक यांचा २०१३ मध्ये फायरिंग स्क्वेअरवर मृत्यूदंडाची शिक्षा दिली होती. त्यांनी पक्षविरोधी करावाई केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवला होता.
किंम यांचा सावत्र भाऊ किंम जोंग नाम हे देखील उत्तर कोरियाचे उत्तराधिकारी होते. मात्र त्यांची देखील मलेशिया आंतरराष्ट्रीय विमानतळावर २०१७ मध्ये हत्या करण्यात आली.