

सेऊल : अंतराळ संशोधनाच्या जागतिकस्पर्धेत आता दक्षिण कोरियाने एक मोठी आणि महत्त्वाकांक्षी घोषणा केली आहे. कोरिया एरोस्पेस अॅडमिनिस्ट्रेशन (KASA) ने दिलेल्या माहितीनुसार, देश 2045 पर्यंत चंद्रावर मानवी तळ ( Moon Base) उभारण्याची योजना आखत आहे. या घोषणेमुळे अमेरिका आणि भारतासारख्या देशांमध्ये सुरू असलेल्या चंद्र मोहिमांच्या शर्यतीला आणखी वेग आला आहे.
कोरिया टाइम्सने 17 जुलै रोजी दिलेल्या वृत्तानुसार, डेजॉन येथील कोरियाच्या राष्ट्रीय संशोधन फाऊंडेशनमध्ये झालेल्या सुनावणीदरम्यान KASA ने आपला भविष्यातील रोडमॅप सादर केला. या योजनेमुळे दक्षिण कोरियाच्या अंतराळ कार्यक्रमाला एक नवी दिशा मिळाली आहे. KASA ने सादर केलेल्या रोडमॅपमध्ये 5 मुख्य मोहिमांचा समावेश आहे, ज्या देशाच्या अंतराळ क्षमतेला एका नव्या उंचीवर नेतील. यामध्ये पृथ्वीच्या निम्न कक्षेचा शोध, कमी गुरुत्वाकर्षणाचा अभ्यास आणि विविध अंतराळ विज्ञान मोहिमांचा समावेश आहे. गेल्या वर्षीच स्थापन झालेल्या KASA चे मुख्य उद्दिष्ट चंद्रावर लँडिंग आणि रोव्हर चालवण्यासाठी लागणारे तंत्रज्ञान संपूर्णपणे देशातच विकसित करणे हे आहे.
या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल उचलत, ‘कोरिया इन्स्टिट्यूट ऑफ जिओसायन्स अँड मिनरल रिसोर्सेस’ने नुकतीच एका बंद पडलेल्या कोळसा खाणीत चंद्रावर चालणार्या रोव्हरच्या प्राथमिक मॉडेलची यशस्वी चाचणी घेतली आहे. भविष्यात चंद्रावर उत्खनन करण्यासाठी वापरल्या जाणार्या तंत्रज्ञानाची ही एक पूर्वतयारी मानली जात आहे. दक्षिण कोरियासाठी चंद्र मोहीम ही पूर्णपणे नवीन नाही. देशाला यापूर्वीच चंद्रावर काम करण्याचा अनुभव आहे. 2022 मध्ये देशाने आपला पहिला चंद्र प्रोब ‘कोरिया पाथफाइंडर लुनार ऑर्बिटर’ (दानुरी) यशस्वीरित्या प्रक्षेपित केला होता. स्पेसएक्सच्या फाल्कन 9 रॉकेटद्वारे पाठवलेले हे यान 4 महिन्यांनंतर चंद्राच्या कक्षेत पोहोचले आणि आजही तेथून चंद्राचा अभ्यास करत आहे.