Nepal Budhi Gandaki flood Bihar alert |नेपाळमध्ये बुढी गंडक नदीला महापूर; ३५ घरे, ६ पूल गेले वाहून

१० जण बेपत्ता : भूस्खलनामुळे अडला स्यारी नदीचा प्रवाह; भारतात बिहारमध्ये गंडक नदीकाठच्या भागांनाही पुराचा धोका
बुढी गंडक नदी
बुढी गंडक नदी
Published on: 
Updated on: 

काठमांडू : वृत्तसंस्था

नेपाळमधील गोरखा जिल्ह्यात रविवारी सकाळी बुढी गंडक नदीला अचानक आलेल्या पुरामुळे मोठी हानी झाली. या पुरात सुमारे ३५ घरे आणि सहा पूल वाहून गेले असून, किमान १० जण बेपत्ता आहेत. बेपत्ता नागरिकांचा शोध सुरू आहे.

पुराच्या पाण्यामुळे ३४१ मेगावॅट क्षमतेच्या बुढी गंडकी जलविद्युत प्रकल्पाचे बांधकाम शिबिर, यंत्रसामग्री आणि अन्य साहित्यही वाहून गेले. या घटनेमुळे नेपाळमधील नदीकाठच्या वस्त्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

भूस्खलनामुळे नदीचा प्रवाह अडला

प्राथमिक माहितीनुसार, डोंगराळ भागात झालेल्या भूस्खलनामुळे चुन्चुब्री परिसरातील स्यारी नदीचा प्रवाह अडला. त्यामुळे पाणी एका ठिकाणी साचले. त्यानंतर अडथळा हटल्याने किंवा फुटल्याने पाण्याचा मोठा लोंढा अचानक खालच्या दिशेने वाहू लागला. रविवारी पहाटे सुमारे चार वाजता पुराचे पाणी वस्त्यांमध्ये शिरले. त्यामुळे नागरिकांना घरे सोडून सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे लागले.

बाजारपेठेत पाणी

सोती परिसरातील मोटार पूल पुरात वाहून गेला, तर बाजारपेठेतही पाणी शिरले. लष्कर आणि सुरक्षा यंत्रणांनी मदत व बचावकार्य सुरू केले. भूस्खलनाचा धोका असलेल्या जगत परिसरातून सहा जणांना हेलिकॉप्टरच्या मदतीने सुरक्षित बाहेर काढण्यात आले.

प्रशासनाकडून एसएमएसद्वारे सतर्कतेचा इशारा

वरच्या भागातून पुराचे पाणी आरुघाटपर्यंत पोहोचण्यासाठी सुमारे तीन तास लागू शकतात. त्यामुळे नदीच्या खालच्या भागातील नागरिकांना स्थलांतरासाठी वेळ मिळू शकतो. प्रशासनाने एसएमएसद्वारे नागरिकांना सतर्क केले असून, सिरदिबास, जगत, यारी, तातोपानी, सोती आणि अरुखोला परिसरातील लोकांना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. सिरदिबास आणि धारचे ग्रामीण नगरपालिका क्षेत्रातील खोर्लाबेसी, माछाखोला, सोती, अरखेत आणि आरुघाट येथील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

दरम्यान, नेपाळमध्ये २६ ऑगस्ट रोजी भोटेकोशी आणि त्रिशूली नदीच्या परिसरात आलेल्या पुरामुळे मोठी हानी झाली होती. नेपाळ सरकारच्या ५ ऑक्टोबरच्या माहितीनुसार, त्या आपत्तीत १,४०० हून अधिक जणांचा मृत्यू झाला, तर सुमारे पाच हजार जण बेपत्ता होते. जवळपास १३,७९५ नागरिकांना वाचवण्यात आले होते.

डोंगराळ भागात पावसाशिवाय अचानक पूर

डोंगरावरून माती आणि दगड घसरून नदीचा मार्ग बंद झाल्यास पाणी साचते. अडथळा तुटल्यानंतर हे पाणी माती, दगड आणि झाडांसह वेगाने खाली येते. त्यामुळे संबंधित गावात त्याच वेळी पाऊस पडत नसला, तरी अचानक पूर येऊ शकतो.

बुढी गंडक नदी
Russia Ukraine Energy Ceasefire| रशिया-युक्रेनमध्ये 'एनर्जी सीझफायर'; डोनाल्ड ट्रम्प यांची ट्रुथ सोशलवरुन घोषणा!

बिहारमध्ये गंडक नदीकाठच्या भागांना धोका

बुढी गंडक नदीचा प्रवाह पुढे त्रिशूली नदीशी संबंधित जलप्रणालीतून देवघाट परिसरात नारायणी नदीला मिळतो. भारतात ही नदी गंडक म्हणून ओळखली जाते आणि पुढे गंगेला मिळते. त्यामुळे नेपाळमध्ये पाण्याचा प्रवाह वाढल्यास बिहारमधील पश्चिम चंपारण, गोपालगंज आणि वैशाली जिल्ह्यातील नदीकाठच्या भागांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

बुढी गंडक नदी
India Rebukes UNHRC : भारताच्या अंतर्गत बाबींत लुडबुड करू नका : संयुक्त राष्ट्र मानवाधिकार आयोगाला परराष्ट्र मंत्रालयाने सुनावले

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news