

सेऊल ः दक्षिण कोरियन शास्त्रज्ञांनी दंतचिकित्सा क्षेत्रात एक क्रांतिकारक शोध लावला आहे, या शोधामुळे भविष्यात कवळी किंवा कृत्रिम दातांची गरज कायमची संपुष्टात येऊ शकते. शास्त्रज्ञांनी बायोअॅक्टिव्ह पॅच विकसित केला आहे. त्यामुळे नैसर्गिकरीत्या दात पुन्हा उगवण्यास मदत होईल.
हा बायोअॅक्टिव्ह पॅच पारंपरिक कृत्रिम दातांप्रमाणे हरवलेल्या दातांची जागा भरून काढण्याऐवजी, हिरड्यांमध्ये दातांची नैसर्गिक वाढ घडवून आणतो. हा पॅच प्रगत बायोअॅक्टिव्ह संयुगांचा वापर करून जबड्यातील मूलपेशींना उत्तेजित करतो. जेव्हा हा पॅच दात नसलेल्या जागेवर लावला जातो, तेव्हा तो शरीराला इनॅमल (कठीण चकाकी असलेले आवरण) आणि डेंटिन यासारख्या नवीन दातांच्या रचना तयार करण्यासाठी संकेत देतो. कालांतराने, रुग्णांना नैसर्गिक शक्ती आणि संवेदनेसह पूर्णपणे कार्यक्षम दात उगवलेले दिसू शकतात. यासाठी कोणतीही शस्त्रक्रिया, इम्प्लांट किंवा कृत्रिम साहित्याची गरज नाही. कवळी किंवा इम्प्लांटसारखे पारंपरिक उपाय केवळ दिसणे आणि चघळण्याची क्षमता निर्माण करतात. परंतु, ते खर्या दातांप्रमाणे संवेदना किंवा जैविक कार्य परत देऊ शकत नाहीत. हा पॅच मात्र हे सर्वकाही बदलतो. पुनरुत्पादक औषधशास्त्रामधील ही एक मोठी झेप आहे, जी जीवशास्त्र, तंत्रज्ञान आणि दंतविज्ञान यांना एका सोप्या आणि विनाआक्रमक स्वरूपात एकत्र आणते.