

डॉ. निखिल देशमुख
रात्री झोपण्यापूर्वी दात घासणे अनेक जण टाळतात. यामागे पारंपरिक सवयी, जागरूकतेचा अभाव आणि जीवनशैलीशी संबंधित कारणे आहेत. भारतात दात घासणे हे मुख्यतः सकाळच्या स्वच्छतेच्या विधीसारखे मानले गेले आहे. दिवसाची सुरुवात ताजेपणाने करण्यासाठी हे आवश्यक वाटते. मात्र, रात्रीच्या वेळी थकवा, विसरभोळेपणा किंवा रात्री दात घासणे तेवढे महत्त्वाचे नाही, असे समजणे यामुळे लोक हे कार्य टाळतात; पण प्रत्यक्षात रात्री दात न घासल्यास अन्नकण व बॅक्टेरिया तोंडात रात्रभर राहतात आणि त्यातून कीड, हिरड्यांचा आजार व दुर्गंधी वाढते.
झोपताना लाळेचे स्रवण कमी होते. लाळ तोंडातील नैसर्गिक स्वच्छता राखते. ती कमी झाल्यावर बॅक्टेरिया वाढण्यासाठी पोषक वातावरण मिळते. जर रात्रीच्या जेवणानंतर किंवा हलक्या खाण्यानंतर दात न घासले तर अन्नकण व प्लँक तोंडात राहतात आणि त्यामुळे कीड, हिरड्यांची सूज, दुर्गंधी व इतर गंभीर समस्या उद्भवतात. झोपण्यापूर्वी दात घासल्याने हे सगळे नुकसान टळते. दात-हिरड्या मजबूत राहतात आणि पुढील काळात महागडे व वेदनादायी दंत उपचार टाळता येतात.
रात्री दात न घासल्यास सकाळी श्वासाला घाणेरडा वास येतो. नियमित दंत स्वच्छतेने श्वास ताजा राहतो. हिरड्यांच्या कडांवर प्लँक साचून त्यांचे टार्टर बनते. यामुळे हिरड्यांना सूज येऊन रक्तस्राव होतो. दोन वेळा दात घासल्यास हे टाळता येते.फ्लोराइडयुक्त टूथपेस्टने इनॅमल मजबूत होते. आम्लाच्या हल्ल्यांपासून बचाव होतो.
मुखारोग्य हे हृदयविकार, मधुमेह व श्वसनविषयक आजारांशी संबंधित आहे. योग्य स्वच्छतेमुळे हे धोके कमी होतात. त्यामुळे दिवसातून दोन वेळा दात घासणे हे केवळ दात-हिरड्यांसाठीच नव्हे तर संपूर्ण आरोग्यासाठी आवश्यक आहे.