

Muhammad Yunus Bangladesh interim government : बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी ढाका सोडण्यापूर्वीच, देशातील सर्वोच्च पदासाठी मुहम्मद युनूस यांची निवड करण्यात आली होती. बांगलादेशात सत्तेत बदल घडवून आणणाऱ्या विद्यार्थी नेत्यांनी नोबेल विजेत्या युनूस यांच्याशी संपर्क साधला होता. ५ ऑगस्ट २०२४ रोजी हसीना सत्तेतून पायउतार होण्याच्या दोन दिवस आधी, त्यांनी युनूस यांना अंतरिम सरकारचे नेतृत्व करण्याची विनंती केली होती, असा दावा युनूस यांचे माजी प्रेस सेक्रेटरी शफीकुल आलम यांनी दिली आहे.
फेसबुकवरील एका पोस्टमध्ये शफीकुल आलम यांनी आरोप केला आहे की, 'एएफपी' (AFP) या वृत्तसंस्थेतील एका पत्रकाराने युनूस आणि आंदोलक पंतप्रधान हसीना यांना सत्तेतून हटवण्याची योजना आखत होते. या पत्रकाराने युनूस आणि आंदोलक यांच्यात दुवा म्हणून काम केले.
आलम यांनी लिहिले की, जेव्हा विद्यार्थी नेत्यांनी नोबेल विजेते प्राध्यापक मुहम्मद युनूस यांच्याशी संपर्क साधून त्यांना अंतरिम सरकारचे नेतृत्व करण्यासाठी आमंत्रित करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांना एका विश्वासू मध्यस्थाची गरज होती. कदरुद्दीन शिशिर यांनी ही महत्त्वाची भूमिका बजावली. त्यावेळी कदरुद्दीन शिशिर हे 'एएफपी'च्या ढाका ब्युरोमध्ये फॅक्ट-चेकिंग टीमचे संपादक होते. आलम यांच्या मते, शिशिर यांनी सत्तेच्या या "अत्यंत जोखमीच्या" हस्तांतरण प्रक्रियेला "पूर्ण गोपनीयतेसह" हाताळले.
केवळ काही मोजक्या विश्वासू व्यक्तींनाच या घडामोडींची माहिती होती. शिशिर यांनीच विद्यार्थी नेत्यांच्या वतीने २००६ च्या नोबेल शांतता पुरस्कार विजेत्या युनूस यांच्याशी सर्वप्रथम संपर्क साधला आणि दोन्ही बाजूंमधील प्राथमिक चर्चेची सोय केली. आलम यांनी स्पष्ट केले की, ही भेट हसीना यांना देश सोडण्यास भाग पाडण्यापूर्वी दोन दिवस आधी झाली होती.
शेख हसीना यांच्या अवामी लीग सरकार कोसळल्यानंतर ८ ऑगस्ट २०२४ रोजी युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम प्रशासनाने सूत्रे हाती घेतली. या सरकारने पुढील दीड वर्ष बांगलादेशचा कारभार पाहिला. २०२५ मध्ये, एका विशेष न्यायाधिकरणाने हसीना यांच्या अनुपस्थितीत खटला चालवून त्यांना फाशीची शिक्षा सुनावली. अंतरिम सरकारने त्यांचा पक्ष, 'अवामी लीग', बरखास्त केला आणि भारताकडे त्यांच्या प्रत्यार्पणाची मागणी केली.
हसीना यांनी युनूस प्रशासनावर आरोप केला होता की, त्यांनी हिंसाचारासाठी जबाबदार असलेल्या व्यक्तींना जबाबदारीतून सुटका मिळवून दिली आहे. त्याच वेळी, त्यांनी असा दावा केला की अवामी लीगच्या सदस्यांविरुद्ध राजकीय हेतूने प्रेरित खटले दाखल करण्यात आले आहेत. त्यानंतरच्या राजकीय व्यवस्थेत राजकीय दडपशाही आणि भीतीचे वातावरण कायम राहिले. नुकत्याच झालेल्या अमेरिका दौऱ्यादरम्यान, न्यूयॉर्कमधील जॉन एफ. केनेडी विमानतळावर अवामी लीगच्या समर्थकांनी युनूस यांना लक्ष्य केल्याचे वृत्त समोर आले आहे. या घटनेचा एक व्हिडिओ नंतर व्हायरल झाला, ज्यामध्ये आंदोलक घोषणा देताना दिसत आहेत: "तू दहशतवादी आहेस, खुनी आहेस!", "तू इथे का आला आहेस?" आणि "तू माझ्या देशात हजारो पोलीस अधिकाऱ्यांना मारले आहेस!" या प्रसंगादरम्यान युनूस स्पष्टपणे अस्वस्थ आणि व्यथित झालेले दिसून आले.