

Japan July 5 Tsunami prediction new baba venga Ryo Tatsuki prophecy
टोकियो : जपानच्या दक्षिणेकडील टोकारा बेटांमध्ये गेल्या काही दिवसांत 500 पेक्षा अधिक भूकंपाचे सौम्य व मध्यम तीव्रतेचे झटके जाणवले आहेत.
जपान मेट्रोलॉजिकल एजन्सीच्या (JMA) माहितीनुसार, ही एक असामान्य भूकंपीय हालचाल असून, यामुळे स्थानिक नागरिक आणि देशभरात जनतेमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या भूकंपमालिकेच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर एक भविष्यवाणी पुन्हा चर्चेत आली आहे. प्रसिद्ध जपानी मांगा कलाकार रयो तात्सुकी यांनी 5 जुलै 2025 रोजी जपानमध्ये महात्सुनामीचे भविष्य वर्तविले आहे. त्यामुळेही जपानमधील नागरिकांमध्ये भीतीचा माहौल तयार झाला आहे.
रयो तात्सुकी यांना काही जण "जपानची बाबा वेंगा" म्हणू लागले आहेत. त्यांच्यावर विश्वास ठेवणाऱ्यांचे म्हणणे आहे की, त्यांनी याआधी काही महत्त्वाच्या जागतिक घटनांची अचूक भविष्यवाणी केली होती, जसे की- 2011 सालचा तोहोकू भूकंप आणि त्सुनामी, कोविड-19 महामारी, प्रिन्सेस डायनाचा मृत्यू.
या भाकितांमुळे तात्सुकी यांची विश्वासार्हता त्यांच्या समर्थकांमध्ये अधिक वाढली आहे, आणि त्यामुळे 5 जुलै 2025 ची भविष्यवाणीही अनेकांच्या चर्चेचा विषय बनली आहे.
1999 मध्ये लिहिलेल्या The Future I Saw या पुस्तकात, त्यांनी 5 जुलै 2025 रोजी जपानमध्ये महात्सुनामीचे भविष्य वर्तविले होते. एक भयंकर नैसर्गिक आपत्ती येईल. त्यांनी "शहरे पाण्यात बुडणे", "उकळता समुद्र", "मोठे बुडबुडे" आणि "2011 च्या त्सुनामीपेक्षाही मोठी त्सुनामी" यांसारख्या दृश्यांचे वर्णन केले आहे.
टोकारा बेटसमूहात गेले काही दिवस सौम्य भूकंपांची मालिका सुरु आहे. त्यातील दोन झटके— रविवार आणि मंगळवारी — मॅग्निट्यूड 5.1 इतक्या तीव्रतेचे होते.
जरी अद्याप कोणतेही मोठे नुकसान झाले नसले, तरी जपानच्या ज्वालामुखी आणि भूकंप निरीक्षण संस्थेने मोठा भूकंप होण्याची शक्यता नाकारलेली नाही. भूशास्त्रज्ञ हिसायोशी योकोसे यांनी सांगितले की, या भागात मॅग्निट्यूड 6.0 किंवा त्याहून मोठा भूकंप होण्याची शक्यता आहे.
टोकारा बेटसमूह हा जपानच्या दक्षिणेकडील क्युषू प्रदेशाच्या अगदी दक्षिणेस वसलेला आहे. येथे सुमारे 700 रहिवासी सात बेटांवर विखुरलेले राहतात. हे बेट अत्यंत दुर्गम असून, येथे पोहोचणे कठीण आहे. त्यामुळे कोणतीही आपत्ती आली तर बचावकार्यात अडचणी येऊ शकतात.
अधिकाऱ्यांचे आवाहन- अफवांवर विश्वास ठेऊ नका...
मियागी प्रीफेक्चरचे राज्यपाल योशिहिरो मुराई यांनी लोकांना शांत राहण्याचे आणि अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार- "5 जुलैसंदर्भात कोणतेही शास्त्रीय पुरावे उपलब्ध नाहीत. ही एक फक्त अफवा आहे. नागरिकांनी गोंधळून न जाता अधिकृत सूचनांचे पालन करावे."
जपान हे पॅसिफिक ‘रिंग ऑफ फायर’ वर वसलेले असून, चार भूकंपीय प्लेट्सच्या संगमावर आहे. त्यामुळे येथे दरवर्षी सुमारे 1500 भूकंप होतात, जे जगातील एकूण भूकंपांपैकी 18 टक्के आहेत. 2024 च्या सुरुवातीला नोटो द्वीपकल्पात आलेल्या भूकंपात 400 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता.
सोशल मीडियावर ही भविष्यवाणी मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाल्यामुळे जुलै महिन्यासाठी जपानमधील पर्यटन बुकिंगमध्ये 50 टक्क्यांपेक्षा जास्त घट नोंदवली गेली आहे. काही ट्रॅव्हल एजन्सींनी सांगितले की, प्रवाशांनी आपली जुलै महिन्यातील जपान सहल रद्द केली असून, विशेषतः दक्षिण जपानकडे जाणाऱ्यांमध्ये भीती आहे.
जपानमधील सध्याची भूकंपीय परिस्थिती गंभीर असली तरी, 5 जुलै 2025 च्या संभाव्य नैसर्गिक आपत्तीविषयी कोणताही वैज्ञानिक आधार सध्या उपलब्ध नाही.
त्यामुळे नागरिकांनी सोशल मीडियावरील अफवांवर विश्वास न ठेवता, अधिकृत यंत्रणांकडून दिल्या जाणाऱ्या सूचनांचे पालन करावे, असा सल्ला अधिकाऱ्यांकडून दिला जात आहे.