

NYC mayor race 2025 Gujarati Muslim Zohran Mamdani Meera Nair Mahmood Mamdani Criticism of BJP, Narendra Modi social media posts controversy
न्यूयॉर्क : प्रसिद्ध चित्रपट निर्मात्या मीरा नायर यांचे पुत्र आणि भारतीय वंशाचे अमेरिकन नेते जोहरान ममदानी हे न्यूयॉर्कच्या महापौरपदाच्या निवडणुकीसाठी डेमोक्रॅटिक पार्टीचे उमेदवार बनण्याच्या शर्यतीत आघाडीवर आहेत. 24 जून रोजी झालेल्या डेमोक्रॅटिक प्रायमरी निवडणुकीत त्यांनी माजी गव्हर्नर अँड्र्यू कुओमो यांना पराभूत करून महत्त्वाची आघाडी घेतली आहे.
या प्रायमरी निवडणुकीत रँक्ड-चॉइस व्होटिंग प्रणाली वापरण्यात आली. पहिल्या फेरीत ममदानींना 43.5 टक्के म्हणजेच सुमारे 432000 मते, तर कुओमो यांना 36.4 टक्के मते मिळाली. ब्रॅड लँडर 11.3 टक्के मतांसह तिसऱ्या स्थानी होते.
कोणालाही 50 टक्क्यांपेक्षा अधिक मते न मिळाल्याने, रँक्ड-चॉइस प्रणालीनुसार कमी मते मिळालेल्या उमेदवारांना वगळून त्यांच्या मतदारांच्या पुढील पसंतीनुसार मते अन्य उमेदवारांना दिली गेली.
या एलिमिनेशन राऊंडमध्ये जोहरान ममदानी यांनी लँडर आणि इतर उमेदवारांचे दुसऱ्या पसंतीची बरेचसे मते मिळवली, त्यामुळे त्यांनी कुओमो यांच्यावर निर्णायक आघाडी घेतली. अंतिम निकाल जुलैमध्ये येणार असला तरी ममदानी यांचे डेमोक्रॅटिक पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून निवडले जाणे निश्चित मानले जात आहे.
नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या जनरल इलेक्शनमध्ये विजयी ठरले, तर जोहरान ममदानी हे न्यूयॉर्क टाउनचे पहिले मुस्लिम आणि भारतीय वंशाचे महापौर ठरतील. डेमोक्रॅटिक पार्टीला या भागात ठोस पाठिंबा असल्याने त्यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे.
जोहरान ममदानी यांचा जन्म 18 ऑक्टोबर 1991 रोजी युगांडा देशाच्या कंपाला शहरात झाला. त्यांचे वडील महमूद ममदानी हे कोलंबिया विद्यापीठात प्राध्यापक असून भारतीय वंशाचे मुस्लिम आहेत. आई मीरा नायर या भारतीय वंशाच्या प्रसिद्ध फिल्ममेकर आहेत. जोहरान लहानपणी केप टाऊन (दक्षिण आफ्रिका) येथे राहिले आणि सातव्या वर्षी न्यूयॉर्कमध्ये स्थायिक झाले.
ते अमेरिकेतील बोडोइन कॉलेजमधून आाफ्रिकन स्टडिजमध्ये पदवीधर झाले. 2018 मध्ये त्यांनी अमेरिकेची नागरिकता घेतली. 2020 मध्ये ते पहिल्यांदाच न्यूयॉर्क स्टेट असेंब्लीसाठी निवडून आले. ते क्वीन्सच्या एस्टोरिया परिसराचे प्रतिनिधित्व करतात.
जोहरान यांनी 2025 च्या सुरुवातीला सीरियाच्या कलाकार रामा दुवाजी यांच्याशी विवाह केला. रामा या प्रसिद्ध इलस्ट्रेटर आणि अॅनिमेटर असून त्यांनी द न्यू यॉर्कर, द वॉशिंग्टन पोस्ट आणि वाईस यांसारख्या प्रसिद्ध माध्यमांमध्ये काम केले आहे.
दरम्यान, एक डेमोक्रॅटिक सोशलिस्ट म्हणून जोहरान यांनी शहरात मोफत बस सेवा चालवण्यासाठी पायलट प्रोग्राम सुरु केला आहे. तसेच त्यांनी एक प्रस्तावित कायदा मांडला आहे ज्यात इज्रायली बस्त्यांना पाठिंबा देणाऱ्या ना-नफा संस्थांवर निर्बंध घालण्याची मागणी आहे.
दरम्यान, जोहरान ममदानी यांच्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर वादग्रस्त टिप्पणी व हिंदूविरोधी भूमिकेमुळे टीका होत आहे. जोहरान ममदानी यांचा ऑनलाइन भडक विधाने करण्याचा दीर्घ इतिहास आहे.
जोहरान ममदानी म्हणाले होते की ते पंतप्रधान मोदींसोबत कोणत्याही मंचावर उभे राहणार नाहीत. त्यांनी मोदींना ‘युद्ध गुन्हेगार’ असे संबोधले होते आणि त्यांची तुलना इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांच्याशी केली होती. मी गुजराती मुस्लिम आहे असेही ते म्हणाले होते. यामुळे अनेक भारतीय व अनिवासी भारतीय संतप्त झाले.
ऑगस्ट 2020 मध्ये टाईम्स स्क्वेअर येथे अयोध्येतील राम मंदिराविरोधात झालेल्या निदर्शनात ते सहभागी झाले होते. त्या ठिकाणी हिंदूंविरोधी द्वेषपूर्ण भाषणे होत असताना जोहरान ममदानी शांत राहिले, यावर त्यांच्यावर प्रचंड टीका झाली.
कंगना रणौत यांनी ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) वर पोस्ट करत म्हटले आहे की, “त्यांची आई मीरा नायर, या भारताच्या श्रेष्ठ चित्रपट निर्मात्यांपैकी एक आहेत. त्यांना पद्मश्री पुरस्कार मिळालेला आहे. त्या भारतात जन्मलेल्या आणि वाढलेल्या असून सध्या न्यूयॉर्कमध्ये राहतात.
त्यांनी महमूद ममदानी (गुजराती मूळाचे) यांच्याशी लग्न केले, जे एक प्रसिद्ध लेखक आहेत. त्यांच्या मुलाचे नाव जोहरान आहे. त्याचे नाव भारतीयापेक्षा जास्त पाकिस्तानी वाटते आणि आता तो हिंदू धर्म नष्ट करण्याच्या तयारीत आहे.”
जोहरान ममदानी यांनी पूर्वी सोशल मीडियावर अनेक भडकाऊ पोस्ट शेअर केल्या आहेत, ज्या आता त्यांच्या महापौर पदाच्या उमेदवारीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा समोर येत आहेत.
ऑगस्ट 2024 मध्ये त्यांनी बाबरी मशीद उध्वस्त केल्याच्या घटनेची फोटो शेअर करत म्हटले की, "ही बाबरी मशीद आहे, 1992 मध्ये झालेल्या दंगलीत ती नष्ट झाली, ज्यांनी केले तोच आता भारतातील सत्ताधारी पक्ष आहे."
7 मे 2024 रोजी एका पोस्टमध्ये त्यांनी लिहिले होते की, "माझ्या कुटुंबाला युगांडामधून हाकलले गेले कारण ते भारतीय होते. आज भारतात माझ्या बंधु-भगिनींना केवळ मुस्लिम असल्यामुळे छळाला सामोरे जावे लागत आहे."
6 ऑगस्ट 2020 रोजीच्या एका पोस्टमध्ये त्यांनी भाजपवर आरोप केला होता की, भाजप भारताचा समावेशक वारसा नष्ट करून हिंदुत्वाचा प्रचार करत आहे.
भाजप हिंदुत्व किंवा हिंदू वर्चस्ववादाचा प्रसार करत आहे. ते अशा भारताचा वारसा नष्ट करू पाहतात जिथे माझे हिंदू आजोबा उर्दू कविता वाचत होते आणि मुस्लिम आजोबा भजन गात होते.”