Miss Universe 2017 contestant Kseniya Alexandrova dies
रशियन मॉडेल आणि माजी मिस युनिव्हर्स स्पर्धक केसेनिया अलेक्जांड्रोवा (वय ३०) हिचा रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे. एका विचित्र अपघातात एक हरीण तिच्या कारच्या विंडशील्डला धडकली. यात ती गंभीर जखमी झाली होती. तिच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरु होते. दरम्यान, तिचा १२ ऑगस्ट रोजी मृत्यू झाला होता.
जुलैमध्ये रशियातील ट्व्हर ओब्लास्टमध्ये ही अपघाताची घटना घडली होती. यात केसेनियाच्या मेंदूला गंभीर दुखापत झाली होती. दरम्यान, १२ ऑगस्ट रोजी तिचा रुग्णालयात मृत्यू झाला, असे वृत्त पीपलने रशियन वृत्तसंस्था रोस्सीस्काया गॅझेटच्या हवाल्याने दिले आहे.
अलेक्जांड्रोवा प्रवासी सीटवर बसली होती. तर तिचा पती कार चालवत होता. पण तेव्हा अचानक एक हरीण उडी मारुन रस्त्यावर आडवी आली. ती त्यांच्या कारला धडकली. तिची एजन्सी मोडस विवेंडिसने इन्स्टाग्रामवर एका निवेदनाद्वारे या वृत्ताची पुष्टी केली आहे.
"आमची सहकारी आणि मैत्री, मॉडेल केसेनिया अलेक्जांड्रोवा हिचे काल रात्री निधन झाल्याची माहिती आम्ही अत्यंत दुःखाने शेअर करत आहोत. केसेनिया हुशार, प्रतिभावान होती. तिला तिच्या अवतीभोवती असलेल्या प्रत्येकाला प्रोत्याहन, आधार कसा द्यायचा? हे माहित होते. आमच्यामध्ये तिचे स्थान नेहमीच सौंदर्य, प्रेमळ आणि आंतरिक शक्तीचे प्रतीक म्हणून राहील. आम्ही तिचे कुटुंब, मित्र आणि तिला जाणून घेतलेल्या प्रत्येकाप्रति मनापासून संवेदना व्यक्त करतो," असे पोस्टमध्ये म्हटले आहे.
"ते आमच्या कारला घडकले आणि निघून गेले. एका क्षणात हे घडले. मला काहीही करता आले नाही," असे अलेक्जांड्रोव्हाच्या पतीने रशियन भाषेतून भाषांतरित केलेल्या निवेदनाद्वारे रोस्सीस्काया गॅझेटाशी बोलताना सांगितले. या अपघातानंतर अलेक्जांड्रोव्हा बेशुद्ध पडली. तिचे कपडे रक्ताने भिजले होते, असेही तिच्या पतीने पुढे सांगितले.
तिच्या पतीने म्हटले आहे की या अपघातानंतर लोकांनी मदतीसाठी आपल्या कार थांबवल्या. या घटनेनंतर सुमारे १५ मिनिटांत आपत्कालीन सेवा घटनास्थळी दाखल झाल्या. अलेक्जांड्रोव्हाला गंभीर जखमी अवस्थेत मॉस्को येथील रुग्णालयात नेण्यात आले. तिथे तिच्यावर महिनाभर उपचार सुरु होते.
२०१७ मधील मिस युनिव्हर्स स्पर्धेत अलेक्जांड्रोव्हाने रशियाचे प्रतिनिधित्व केले होते. त्याच वर्षीच्या सुरुवातीला ती मिस रशिया स्पर्धेत ती फर्स्ट रनर-अप ठरली होती.