

US, Israel attack Iran
नवी दिल्ली : इराण विरोधात अमेरिका आणि इस्त्रालयाने सुरु केलेल्या हल्ल्याचे सावट आता विमान वाहतुकीवरही पडू लागले आहे. मध्यपूर्वेतील अनेक देशांनी आपली हवाई हद्द बंद केल्या आहेत. एअर इंडियाने रविवारी युरोपसह अनेक महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय मार्गांवरील आपली उड्डाणे रद्द करण्याची घोषणा केली आहे. इराणने आखाती देशांमधील अमेरिकन तळांना लक्ष्य केल्याने या भागातील परिस्थिती अधिक चिघळली आहे.
एअर इंडियाच्या प्रवक्त्यांनी स्पष्ट केले आहे की, , "मध्यपूर्वेतील बदलत्या परिस्थितीवर आम्ही बारकाईने लक्ष ठेवून आहोत. आमच्या प्रवासी आणि कर्मचाऱ्यांची सुरक्षा हेच आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे. सध्याची अनिश्चितता पाहता, खबरदारीचा उपाय म्हणून काही नियोजित उड्डाणे रद्द करण्याचा निर्णय घेणे भाग पडले आहे."
एअर इंडियाने रद्द केलेल्या विमानांमध्ये प्रामुख्याने दिल्ली, मुंबई आणि बेंगळुरू येथून सुटणाऱ्या खालील सेवांचा समावेश आहे:
मुंबई-लंडन (हिथ्रो): AI131 / AI130
दिल्ली-बर्मिंगहॅम: AI113 / AI118
दिल्ली-अॅमस्टरडॅम: AI155 / AI156
दिल्ली-झुरिच: AI151 / AI152
दिल्ली-मिलान: AI137 / AI138
दिल्ली-व्हिएन्ना: AI153 / AI154
बेंगळुरू-लंडन (हिथ्रो): AI133 / AI132
दिल्ली-कोपनहेगन: AI157 / AI158
दिल्ली-फ्रँकफर्ट: AI2029 / AI2030
केरळमधील चार आंतरराष्ट्रीय विमानतळांवरून आखाती देशांत जाणारी बहुतांश उड्डाणेही रद्द करण्यात आली आहेत. विमानतळावर येण्यापूर्वी विमानांची स्थिती (Flight Status) तपासून घेण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या असल्या, तरी अनेक प्रवाशांनी विमानसेवा पुन्हा सुरू होईल या आशेने विमानतळावरच ताटकळणे पसंत केले आहे.
दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील कामकाज पूर्णपणे ठप्प झाले आहे. इराणच्या एका ड्रोनने दुबई विमानतळाला लक्ष्य केल्याचे वृत्त असून, यामध्ये एका टर्मिनलचे नुकसान झाले असून चार जण जखमी झाले आहेत, असे वृत्त खलीज टाइम्स'ने दिले आहे. दरम्यान, शनिवारी अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या संयुक्त हल्ल्यानंतर इराणने प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केल्याने संपूर्ण आखाती प्रदेशात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे.