Microsoft shuts down Pakistan
इस्लामाबाद : तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपनी मायक्रोसॉफ्टने पाकिस्तानमधील आपला २५ वर्षांचा प्रवास थांबवण्याचा धक्कादायक निर्णय घेतला आहे. देशातील अस्थिर व्यावसायिक वातावरण आणि अनिश्चिततेमुळे कंपनीने हा निर्णय घेतला असून, आता पाकिस्तानातून आपला गाशा गुंडाळला आहे.
मायक्रोसॉफ्ट पाकिस्तानच्या संस्थापकांपैकी एक असलेल्या जव्वाद रहमान यांनीच ही माहिती उघड केल्याने, पाकिस्तानच्या तंत्रज्ञान आणि उद्योग जगतात मोठी खळबळ उडाली आहे.
मायक्रोसॉफ्ट पाकिस्तानमधून बाहेर पडत असल्याची माहिती जव्वाद रहमान यांनी आपल्या लिंक्डइन पोस्टद्वारे दिली. त्यांनी लिहिले, "एका युगाचा अंत झाला आहे. बरोबर २५ वर्षांपूर्वी जून महिन्यातच मला पाकिस्तानात मायक्रोसॉफ्ट सुरू करण्याची जबाबदारी मिळाली होती. आज कंपनीच्या उरलेल्या काही कर्मचाऱ्यांना कळवण्यात आले आहे की मायक्रोसॉफ्ट पाकिस्तानमधून बाहेर पडत आहे." या वृत्तानुसार, कंपनीने आपले कामकाज जवळपास पूर्णपणे थांबवले असून, आता केवळ एका कार्यालयात फक्त ५ कर्मचारी शिल्लक आहेत.
मायक्रोसॉफ्टने यावर अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, जव्वाद रहमान यांनी या निर्णयामागे देशातील निराशाजनक परिस्थिती जबाबदार असल्याचे म्हटले आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये स्पष्टपणे लिहिले की, "हा निर्णय आपल्या देशानेच निर्माण केलेल्या वातावरणाचे प्रतिबिंब आहे. हे एक असे वातावरण आहे, जिथे मायक्रोसॉफ्टसारख्या बलाढ्य कंपनीलाही अस्थिरता आणि धोका जाणवतो." त्यांनी प्रश्न उपस्थित केला की, देशात असे काय बदलले की एका दिग्गज कंपनीला देश सोडून जाण्याची वेळ आली?
रहमान यांनी पाकिस्तानचे आयटी मंत्री आणि सरकारला आवाहन केले आहे की, त्यांनी मायक्रोसॉफ्टच्या जागतिक आणि प्रादेशिक अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, जेणेकरून कंपनीला पाकिस्तानात थांबण्यासाठी विनंती करता येईल. त्याचवेळी त्यांनी एक सूचक इशाराही दिला. ते म्हणाले, "अल्लाह ज्याला इच्छितो, त्याला सन्मान आणि संधी देतो... आणि ज्याच्याकडून इच्छितो, त्याच्याकडून ते परतही घेऊ शकतो, विशेषतः जेव्हा कुणी त्याची किंमत विसरते."