

Mexican ship Brooklyn Bridge accident
न्यू यॉर्क : न्यू यॉर्कमध्ये प्रवेश करत असताना मेक्सिकन नौदलाचे एक प्रशिक्षण जहाज शनिवारी ब्रुकलिन ब्रिजवर आदळले. या अपघातात जहाजाचा उंच भाग पुलाला धडकून डेकवर कोसळला. यात जहाजावरील दोन नौसैनिकांचा मृत्यू झाला आहे. तर 19 जण जखमी झाले आहेत.
अशी माहिती अधिकाऱ्यांनी आणि वृत्तसंस्थांनी दिली आहे. अपघाताच्या वेळी जहाजावर 277 जण उपस्थित होते. ‘क्वाओटेमोक’ (Cuauhtémoc) असे या जहाजाचे नाव आहे.
मेक्सिकन नौदलाने X (पूर्वीचे ट्विटर) वर स्पॅनिशमध्ये दिलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “क्वाओटेमोक जहाज न्यू यॉर्कमधून बाहेर पडताना ब्रुकलिन ब्रिजसोबत एक अपघात झाला, त्यामुळे प्रशिक्षणार्थी जहाजाचे नुकसान झाले आणि प्रशिक्षण प्रवास तात्पुरता थांबवावा लागला."
न्यू यॉर्कचे महापौर एरिक अॅडम्स यांनी सांगितले की, या घटनेत 19 लोक जखमी झाले असून त्यापैकी चौघांची प्रकृती गंभीर आहे. या चौघांपैकी दोन जणांचा नंतर मृत्यू झाला, असे अॅडम्स यांनी रविवारी सकाळी सोशल मीडियातून सांगितले.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओंमध्ये पांढऱ्या गणवेशातील नौदल कर्मचारी क्रॉसबीमवरून लटकताना दिसत आहेत. एका व्हिडिओत जहाजाचा उंच भाग ब्रिजवर आदळताना दिसतो आणि नंतर तो जहाजाच्या डेकवर कोसळतो. काही प्रवासी थेट त्या खाली उभे होते. दुसऱ्या व्हिडिओत जहाज धडकल्यानंतर ब्रुकलिन ब्रिज खाली थरथरताना दिसतो.
न्यू यॉर्क पोलिस दलाच्या विशेष ऑपरेशन्स प्रमुख विल्सन अँराम्बोल्स यांनी सांगितले की जहाज मॅनहॅटनच्या किनाऱ्यावरून निघाले होते आणि समुद्राकडे जाण्याचे नियोजन होते – ब्रिजकडे नव्हे. प्राथमिक माहितीनुसार, जहाजाच्या पायलटला यांत्रिक बिघाडामुळे नियंत्रण गमवावे लागले, मात्र ही माहिती अजून प्राथमिक स्वरूपाची आहे, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
ब्रुकलिन ब्रिजच्या खाली पार्कमध्ये उपस्थित असलेल्या काही लोकांच्या ओरडण्याचा आवाज व्हिडिओत ऐकू येतो. एका सोशल मीडिया युजरने लिहिले आहे की, “अपघात होण्याआधी मी मेक्सिकन नौदलाच्या जहाजाचा तो सुंदर क्षण टिपू शकलो, हे खूप आनंददायक आहे."
तर दुसऱ्याने म्हटले आहे की, “मी प्रत्यक्ष पाहिले की ब्रुकलिन ब्रिजला एक भलंमोठं मेक्सिकन झेंडा असलेलं जहाज जोरात धडकले!"