

Mali five Indians kidnapped : पश्चिम मालीमधील कोबरीजवळ विद्युतीकरण प्रकल्पावर काम करणाऱ्या पाच भारतीय नागरिकांचे अपहरण करण्यात आले आहे. अद्याप कोणत्याही गटाने या कृत्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही. मात्र, अल-कायदा-आयएस-आयएस (ISIS) शी संबंधित दहशतवाद्यांवर संशय व्यक्त करण्यात येत आहे.
वृत्तसंस्था एएफपीनुसार, गुरुवारी पश्चिम मालीमधील कोबरीजवळ काही सशस्त्र लोकांनी भारतीयांचे अपहरण केले. ते स्थानिक विद्युतीकरण प्रकल्पांमध्ये गुंतलेल्या एका कंपनीत काम करत होते, असे एका सुरक्षा सूत्राने सांगितले.कंपनीच्या प्रतिनिधीने सांगितले की, त्यानंतर इतर सर्व भारतीय कामगारांना राजधानी बामाको येथे हलवण्यात आले आहे. अद्याप कोणत्याही गटाने अपहरणांची जबाबदारी स्वीकारलेली नाही.
वास्तविक, जुलैमध्येही 3 भारतीय नागरिकांचे अपहरण करण्यात आले होते. हे तिघे राजस्थान, ओडिशा आणि तेलंगणाचे रहिवासी होते. 1 जुलै रोजी ही घटना घडली होती. अल-कायदाशी संबंधित दहशतवादी संघटना जमात नुसरत अल-इस्लाम वल-मुसलमीन (JNIM) ने तिघांच्या अपहरणाची जबाबदारी घेतली होती.अल-कायदाशी संबंधित या दहशतवादी गटाने अलीकडच्या काळात मालीमध्ये अनेक हल्ल्यांची जबाबदारी घेतली आहे.
सरकारी आकडेवारीनुसार, सध्या सुमारे 400 भारतीय मालीमध्ये राहतात आणि काम करतात. यापैकी अनेक जण बांधकाम खाणकाम आणि पायाभूत सुविधा क्षेत्रात काम करतात. 2012 पासून सत्तापालट आणि संघर्षांना तोंड देत असलेल्या या देशात परदेशी नागरिकांचे अपहरणाच्या घटना घडलया आहेत. मालीच्या साहेल प्रदेशात माली, नायजर आणि बुर्किना फासो यांचा समावेश आहे. येथे 2012 पासून हिंसाचारात सतत वाढ होत आहे. या बंडाची सुरुवात उत्तर मालीतून झाली होती. ग्लोबल टेररिस्ट इंडेक्सने या क्षेत्राला जागतिक दहशतवादाचे मुख्य केंद्र म्हटले आहे.
२०१२ मध्ये तुआरेग बंडातून जन्मलेल्या जेएनआयएमने उत्तर मालीपासून देशाच्या मध्यभागी आणि सीमा ओलांडून बुर्किना फासो आणि नायजरपर्यंत आपला विस्तार सातत्याने वाढवला आहे. मालीचे जंटा नेते असिमी गोइता हे बंडखोरी चिरडून टाकण्याचे वचन देऊन सत्तेवर आले, परंतु फ्रान्स आणि अमेरिकेशी संरक्षण संबंध तोडण्याचा आणि रशियासमोर मैत्रीचा हात पुढे करण्याचा त्यांचा निर्णय फारसा यशस्वी झाला नाही.बामाको अजूनही सरकारी नियंत्रणाखाली असताना, जेएनआयएम राजधानीकडे जाण्याची चिंता अनेक मालीवासीयांना आहे. ज्या भागात त्यांचे वर्चस्व आहे, तेथे या गटाने कडक नियम लागू केले आहेत, हालचालींवर निर्बंध घातले आहेत आणि सार्वजनिक वाहतुकीत महिलांना हिजाब घालण्याचे आदेश दिले आहेत.