

Shah Rukh Khan saved Pujara's career
मुंबई : खेळ कोणताही असो, खेळाडूंच्या कारकिर्दीचा आलेख हा चढ-उतारांच्या हेलकाव्यांनी भरलेला असतो. अनेकदा यशाच्या सर्वोच्च शिखरावरून सारे काही बदलते. मोठ्या-मोठ्या दिगग्जांच्या कारकिर्दीलाही ओहोटी लागते आणि त्यांचा प्रवास थांबण्याच्या मार्गावर येतो. मात्र, काहींना संकटाच्या गर्तेतून बाहेर काढण्यासाठी देवदूताप्रमाणे एखादी व्यक्ती धावून येते आणि खेळाडूच्या संपूर्ण कारकिर्दीलाच एक अविस्मरणीय कलाटणी मिळते. असेच काहीसे भारताचा माजी क्रिकेटपटू चेतेश्वर पुजारा याच्याबाबतही झालं. आणि त्याला कठीण काळात मदत करणारी व्यक्ती होती बॉलिवूडचा ‘किंग खान’ अशी ओळख असणारा शाहरुख खान. पुजाराच्या क्रिकेट कारकिर्दीला पुन्हा बहर देण्यासाठी नेमकं काय घडलं, याविषयी जाणून घेऊया...
'द डायरी ऑफ अ क्रिकेटर्स वाईफ'मध्ये चेतेश्वर पुजाराची पत्नी पूजा यांनी 'द डायरी ऑफ अ क्रिकेटर्स वाईफ' या पुस्तकामध्ये पुजाराच्या क्रिकेट कारकीर्दीतील कोणालाही फारशी माहीत नसणारी गोष्टीचा उल्लेख केला आहे. यामध्ये अभिनेता शाहरुख खानमुळे पुजाराची क्रिकेट कारकीर्द कशी बहरली याची माहिती दिली आहे.
अवघ्या २१ व्या वर्षी पुजारा हा आयपीएलमधील शाहरुख खानचा संघ कोलकाता नाईट रायडर्सकडून मैदानावर उतरणार होता. देशांतर्गत क्रिकेटमध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याने त्याचे केकेआर संघातील स्थान पक्के झाले होते. आता उज्ज्वल भवितव्य दृष्टीक्षेपात असतानाच सरावावेळी झेल घेताना त्याच्या गुडघ्याला दुखापत झाली.
या दुखापतीमुळे भारताच्या कसोटी संघातील मुख्य खेळाडू बनण्याच्या खूप आधी पुजाराची क्रिकेट कारकीर्द जवळजवळ संपुष्टातच आली होती. २००९ आयपीएल हंगामाला त्याला मुकावे लागले होते. मात्र याचवेळी केकेआर व्यवस्थापनाने तत्काळ पुजाराची सर्व जबाबदारी घेतली. फ्रँचायझीने सर्व वैद्यकीय खर्च भागवण्याचे आश्वासन दिले. शाहरुख खानने क्रीडा दुखापतींमध्ये तज्ज्ञ डॉक्टर असणाऱ्या दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊनमध्ये शस्त्रक्रिया करण्याची व्यवस्था केली. मात्र पुजाराच्या वडिलांनी दक्षिण आफ्रिकेमध्ये शस्त्रक्रिया करण्यास अप्रत्यक्ष नकार दिला. ते मुलाला घेऊन राजकोटला परत जाण्याच्या विचारात होते. राजकोटमध्ये कौटुंबिक मित्र डॉ. निर्भय शाह हे ऑपरेशन करू शकतील. परदेशात सपोर्ट सिस्टीम नसल्याबद्दल त्यांना काळजी वाटत होती, असेही पूजा यांनी आपल्या पुस्तकात नमूद केले आहे.
शाहरुख खानने पुजाराच्या वडिलांची भेट घेतली. गुडघ्यावरील शस्त्रक्रियेसाठी दक्षिण आफ्रिका हे सर्वोत्तम ठिकाण असल्याचे सांगितले. तसेच चिंटूचे (चेतेश्वर पुजाराचे टोपण नाव) भविष्य उत्तम आहे. त्याला सर्वोत्तम वैद्यकीय उपचार मिळायला हवेत, असे स्पष्ट करत शाहरुखने पुजाराच्या वडिलांना त्याच्यासोबत कुटुंबातील एक व्यक्ती जाईल, असेही स्पष्ट केले होते. तसेच अत्यंत कमी वेळेत पासपोर्ट, व्हिसा आणि प्रवास व्यवस्थेचे नियोजन केले. त्यामुळे अशक्य वाटणारी गोष्ट शक्य झाली. काही दिवसांतच, पुजाराचे वडील आणि डॉ. शाह केपटाऊनमध्ये होते, असेही पूजाने आपल्या पुस्तकात नमूद केले आहे.
दक्षिण आफ्रिकेमधील शस्त्रक्रिया यशस्वी झाली. पुजारा पूर्णपणे बरा झाला. त्याची आयपीएल कारकीर्द कधीही यशस्वी झाली नाही, तरीही तो भारताच्या सर्वात विश्वासार्ह कसोटी फलंदाजांपैकी एक बनला. शाहरुख खानने त्याला अत्यंत कठीण प्रसंगी केलेल्या मदतीमुळे टीम इंडियाला कसोटीत एक उत्कृष्ट फलंदाज गवसला, असेही पूजाने आपल्या पुस्तकात स्पष्ट केले आहे.