

Ayatollah Ali Khamenei funeral : इराणचे माजी सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांना आज( दि. ९ जुलै) दफन केले जाईल. खामेनी यांचे पार्थिव इराकहून इराणमधील मशहद येथे आणण्यात आले. मशहद येथे विमान दाखल झाल्याचा व्हिडिओही इराणने जारी केला आहे.
यासोबतच इराण आणि इराकमध्ये गेल्या सहा दिवसांपासून सुरू असलेल्या अंत्यसंस्कार मोहिमेची सांगता होईल. खामेनी यांच्या शवपेटीसोबत २८ फेब्रुवारी रोजी झालेल्या अमेरिका-इस्रायली हवाई हल्ल्यात ठार झालेल्या त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचेही मृतदेह आहेत. या हल्ल्यामुळेच मध्य पूर्वेमध्ये मोठ्या युद्धाची ठिणगी पडली होती.सर्वोच्च नेत्यांच्या अधिकृत वेबसाईटद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेल्या व्हिडिओनुसार, खमेनी यांची शवपेटी घेऊन येणारे विमा मशहद शहरात पोहोचले, तेव्हा किमान एका फायटर जेटने त्या विमानाला एस्कॉर्ट (सुरक्षा पहारा) दिले होते.
खामेनी आणि त्यांच्या कुटुंबीयांचे पार्थिव इराकमधून आणण्यात आले आहे. इराकमधील नजाफ आणि कर्बला या पवित्र शहरांमध्ये अंत्यसंस्कारासाठी अथांग जनसागर उसळला होता. मशहदमध्ये पार्थिव आणण्यापूर्वी तेहरान, धार्मिक केंद्र असलेले कोम आणि इराक मधील दोन शहरे अशा विविध ठिकाणी पाच दिवसांचा दुखवटा पाळण्यात आला होता.
आज संध्याकाळी इराणमधील सर्वात पूजनीय स्थळ समजल्या जाणाऱ्या 'इमाम रेझा दर्गा' येथे खमेनी यांच्या पार्थिवाचे दफन केले जाईल. २८ फेब्रुवारीच्या हवाई हल्ल्यात मृत्यमुखी पडलेल्या खामेनी यांची चिमुरडी नात, जावई, मुलगी आणि त्यांचा मुलगा मोजताबा खमेनी यांची पत्नी जहरा हद्दाद अदेल यांच्या पार्थिवांचेही खमेनी यांच्यासोबतच दफन केले जाईल. अधिकृत 'इर्ना' (IRNA) वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, १०१ वर्षांचे आयातुल्ला होसेन नुरी हमेदानी हे अंत्यसंस्काराची प्रार्थना पठण करणार आहेत. दरम्यान, खामेनी यांचे चीफ ऑफ स्टाफ मोहम्मद मोहम्मदी-गोलपायगानी यांनी सरकारी दूरदर्शनवर सांगितले होते की, खमेनी यांची आपल्या मूळ गावीच दफन केले जावे अशी वैयक्तिक इच्छा होती.
एकीकडे दफनविधीची तयारी अंतिम टप्प्यात असताना, दुसरीकडे अमेरिका आणि इराण यांच्यात सलग दुसऱ्या दिवशीही एकमेकांवर हल्ले प्रतिहल्ले सुरूच होते.इराणने कुवेत, बहरीन आणि कतारमधील अमेरिकन लष्करी तळांना लक्ष्य करून पुन्हा हल्ले सुरू केल्याचे म्हटले आहे. 'स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ' (Strait of Hormuz) वरून निर्माण झालेल्या तणावामुळे हे युद्ध पुन्हा भडकले असून, यामुळे संपूर्ण मध्य पूर्वेमध्ये मोठ्या प्रमाणावर युद्ध सुरू होण्याची भीती निर्माण झाली आहे.