

वॉशिंग्टन, वृत्तसंस्था : डेमोक्रॅटिक पक्षाच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवार कमला हॅरिस यांच्या लोकप्रियतेमध्ये वाढ होत असल्याचे सर्वेक्षणातून पुढे आले आहे. रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यापेक्षा कमला यांना रेटिंगमध्ये पसंती मिळत असल्याचे चित्र आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी वार्धक्यामुळे राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतून माघार घेतली. त्यानंतर उपाध्यक्ष कमला यांच्या उमेदवारीवर डेमोक्रॅटिक पक्षाने शिक्कामोर्तब केले. यानंतर भारतीय वंशाच्या कमला यांनी प्रचाराचा धडाकाच लावला आहे. नोव्हेंबर महिन्यात अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदासाठी निवडणूक होत आहे. अमेरिकेतील वृत्तवाहिन्यांनी केलेल्या सर्वेक्षणामध्ये कमला हॅरिस यांच्या रेटिंगमध्ये वाढ होत आहे. असोसिएटेड प्रेस आणि एनओआरसी या पब्लिक अफेअर्स रिसर्च सेंटरद्वारे करण्यात आलेल्या सर्वेक्षणामध्ये अमेरिकेतील 48 टक्के नागरिकांनी हॅरिस यांच्या बाजूने कल दर्शविला आहे. माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यासोबतच्या डिबेटमध्ये बायडेन यांचा पराभव झाला. त्यावेळी कमला यांना 39 टक्के नागरिकांची पसंती होती. कमला हॅरिस यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाल्यानंतर सुरू असलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर हॅरिस यांना जनाधार मिळत आहे. तर ट्रम्प यांना 41 टक्के लोकांनी पाठिंबा दर्शविला आहे. अन्य काही वाहिन्यांच्या जनमत चाचण्यांमध्ये हॅरिस आणि ट्रम्प यांच्यात चुरशीची शक्यता वर्तविली आहे. हॅरिस आणि ट्रम्प यांना अनुक्रमे 49 टक्के आणि 45 टक्के अनुकूलता दर्शविली आहे.