

Johnson and Johnson lawsuit : जगभरात वापरल्या जाणाऱ्या 'जॉन्सन अँड जॉन्सन' (Johnson & Johnson) या बेबी पावडर ब्रँडवर कर्करोगास कारणीभूत ठरल्याचे हजारो गंभीर आरोप झाले आहेत. या प्रकरणातील प्रदीर्घ कायदेशीर लढाई आता एका महत्त्वाच्या वळणावर आली असून, कंपनीने बेबी पावडर व इतर 'टॅल्क' आधारित उत्पादनांशी संबंधित हजारो दावे व खटले मागे घेण्यासाठी तब्बल ५.५ अब्ज डॉलर (सुमारे ५२ हजार कोटी रुपये) देण्याची घोषणा केली आहे.
तडजोड करारात सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे कंपनीने आपल्या उत्पादनांमुळे कर्करोग होतो, हा दावा अथवा आपली कोणतीही कायदेशीर चूक मान्य केलेली नाही. कंपनीच्या मते, तिच्यावरील आरोप पूर्णपणे निराधार आहेत; परंतु प्रदीर्घ कायदेशीर प्रक्रियेचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी आणि या वादातून बाहेर पडण्यासाठी तडजोडीचा मार्ग स्वीकारण्यात आला आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून हजारो महिलांनी जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीविरोधात न्यायालयात दावे दाखल केले होते. कंपनीच्या बेबी पावडर व टॅल्क आधारित उत्पादनांच्या प्रदीर्घ वापरामुळे आपल्याला 'ओव्हेरियन कॅन्सर' (अंडाशयाचा कर्करोग) झाल्याचा आरोप या महिलांनी केला आहे.
सोमवारी (दि.२७ जुलै) कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, हा तडजोड करार सुमारे ७६ हजार दाव्यांना (Claims) लागू पडेल. यात न्यू जर्सी येथील फेडरल कोर्ट तसेच विविध राज्यांतील न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेल्या खटल्यांचा समावेश आहे. या करारामुळे कंपनीविरोधातील टॅल्कशी संबंधित जवळपास सर्व उर्वरित खटल्यांचा निपटारा होईल.
जॉन्सन अँड जॉन्सनने न्यायालयात आणि प्रसिद्धीपत्रकात सातत्याने भूमिका मांडली आहे की, तिची टॅल्क उत्पादने पूर्णपणे सुरक्षित असून त्यात 'एस्बेस्टॉस' चे कोणतेही अंश नव्हते.(टीप: एस्बेस्टॉस हे एक नैसर्गिक खनिज असून त्याच्या अतिसूक्ष्म तंतूंमुळे कर्करोगाचा धोका असतो. पूर्वीच्या काळात रोधक म्हणून विविध उत्पादनांमध्ये याचा वापर केला जात असे.
'द गार्डियन'च्या वृत्तानुसार, हा तडजोड करार तेव्हाच अंतिम मानला जाईल, जेव्हा ओव्हेरियन कॅन्सरशी संबंधित किमान ९५ टक्के दावेदार या प्रस्तावाला मंजुरी देतील. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, २०२७ मध्ये: ३ अब्ज डॉलर दिले जातील.२०२८ मध्ये: उर्वरित रक्कम अदा केली जाईल. दावेदारांची संख्या वाढल्यास ही एकूण रक्कम ७ अब्ज डॉलर (सुमारे ६० हजार कोटी रुपयांहून अधिक) पर्यंत पोहोचू शकते, असे याचिकाकर्त्यांच्या वकिलांचे म्हणणे आहे.
जॉन्सन अँड जॉन्सनच्या बेबी पावडरची जगभरात कोट्यवधी विक्री होत होती. परंतु, टॅल्क पावडरच्या वापरामुळे ओव्हेरियन कॅन्सर होत असल्याचा आरोप हजारो महिलांनी केल्याने कंपनीच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला.याशिवाय, काही खटल्यांमध्ये उत्पादनांतील एस्बेस्टॉसमुळे 'मेसोथेलिओमा' (Mesothelioma - फुफ्फुसाचा दुर्मिळ कर्करोग) झाल्याचा दावाही करण्यात आला होता. यापैकी बहुतांश मेसोथेलिओमा प्रकरणांचा निपटारा कंपनीने आधीच स्वतंत्र तडजोडीद्वारे केला आहे.
गेल्याच आठवड्यात कंपनीला न्यायालयात एक महत्त्वपूर्ण दिलासा मिळाला होता. एका न्यायमूर्तींनी प्रश्न उपस्थित केला होता की, "वैयक्तिक दावेदार हे सिद्ध करू शकतील का, की त्यांच्या कर्करोगाचे एकमेव कारण हे टॅल्क उत्पादनच होते?"कंपनीच्या दाव्यानुसार, न्यायालयात त्यांनी अनेक खटले जिंकले आहेत, तर काही प्रकरणी वादींच्या वैद्यकीय तज्ज्ञांची साक्ष न्यायालयाने अमान्य केली आहे.
जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीने २०२० मध्ये अमेरिका आणि कॅनडामध्ये टॅल्क आधारित बेबी पावडरची विक्री थांबवली होती. त्यानंतर 'कॉर्नस्टार्च' (Cornstarch) आधारित पावडर बाजारात आणली. तथापि, हा निर्णय सुरक्षेच्या कारणास्तव नसून, ग्राहकांची बदलती मागणी व व्यावसायिक रणनीतीचा भाग म्हणून घेतल्याचे कंपनीने स्पष्ट केले होते.
खटल्यांच्या प्रचंड ओझ्यातून सुटका करून घेण्यासाठी कंपनीने 'टेक्सास टू-स्टेप' (Texas Two-Step) या वादग्रस्त कायदेशीर मार्गाचा वापर केला होता. यानुसार, एका सहाय्यक कंपनीची (Subsidiary) स्थापना करून तिच्याद्वारे तीन वेळा दिवाळखोरी संरक्षणासाठी अर्ज करण्यात आला होता, जेणेकरून सर्व खटले एकाच मंचावर मिटवता येतील.परंतु, अमेरिकन न्यायालयांनी कंपनीचे हे दिवाळखोरीचे अर्ज फेटाळून लावले. त्यानंतर मार्च २०२५ मध्ये न्यायालयांमधील मूळ खटले पुन्हा सुरू झाले.
जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीचा हा प्रस्तावित तडजोड करार केवळ सध्या प्रलंबित असलेल्या प्रकरणांसाठीच लागू असेल. भविष्यात दाखल होणाऱ्या नवीन खटल्यांवर याचा परिणाम होणार नाही.दावेदारांच्या बाजूने लढणाऱ्या वकिलांच्या मते, पूर्वीच्या प्रस्तावांच्या तुलनेत या करारात पीडितांना अधिक भरपाई मिळणार असून, संपूर्ण रक्कम पुढील १८ महिन्यांच्या कालावधीत मिळण्याची शक्यता आहे.