

Bill Gates STD Epstein files
वॉशिंग्टन डी सी: मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स यांच्याबद्दल एक खळबळजनक दावा समोर आला आहे. बाललैंगिक शोषणातील गुन्हेगार जेफ्री एप्सटिन यांच्या ईमेलमध्ये, 'बिल गेट्स यांनी रशियन महिलांशी शारीरिक संबंध ठेवले होते. त्यातून त्यांना लैंगिक संक्रमित आजार झाला होता आणि त्यांनी ही बाब आपली पत्नी मेलिंडा गेट्स यांच्यापासून लपवून ठेवली होती,' असा दावा करण्यात आला आहे. अमेरिकेच्या न्याय विभागाने शुक्रवारी प्रसिद्ध केलेल्या ३० लाख पानांच्या कागदपत्रांमधून ही माहिती उघड झाली आहे.
अमेरिकन न्याय विभागाने नुकतीच जेफरी एपस्टीन प्रकरणाशी संबंधित कागदपत्रे सार्वजनिक केली आहेत. यामध्ये एपस्टीनने २०१३ मध्ये स्वतःलाच पाठवलेल्या काही ईमेल ड्राफ्ट्सचा समावेश आहे. या ईमेल्समध्ये असा दावा करण्यात आला आहे की, गेट्स यांनी रशियन मुलींसोबत वेळ घालवला होता. इतकेच नाही तर, हा आजार आपल्या पत्नीला (मेलिंडा गेट्स) होऊ नये किंवा झाला असल्यास त्यावर उपचार करण्यासाठी गेट्स यांनी गुपचूप अँटीबायोटिक्सची मागणी केली होती, असाही उल्लेख या कागदपत्रात आहे.
या आरोपांनंतर बिल गेट्स यांच्या प्रवक्त्यांनी सर्व दावे फेटाळून लावले आहेत. "हे आरोप पूर्णपणे निराधार, हास्यास्पद आणि खोटे आहेत. बिल गेट्स यांनी एप्सटिनशी संबंध तोडल्यामुळे तो नाराज होता. केवळ सूडबुद्धीने आणि बदनामी करण्याच्या उद्देशाने एप्सटिनने हे बनावट ईमेल ड्राफ्ट तयार केले होते," असे स्पष्टीकरण गेट्स यांच्या बाजूने देण्यात आले आहे.
बिल आणि मेलिंडा गेट्स यांचा २७ वर्षांचा संसार २०२१ मध्ये मोडला. मेलिंडा गेट्स यांनी एका मुलाखतीत स्पष्ट केले होते की, बिल गेट्स यांची एप्सटिनसोबतची मैत्री हे त्यांच्या घटस्फोटाच्या अनेक कारणांपैकी एक महत्त्वाचे कारण होते. आता या खुलाशामुळे या चर्चेला पुन्हा उधाण आले आहे.
अमेरिकेतील राजकीय वर्तुळात या कागदपत्रांवरून मोठे वादंग निर्माण झाले आहे. डेमोक्रॅटिक पक्षाच्या नेत्यांनी आरोप केला आहे की, एकूण ६० लाख पानांपैकी केवळ निम्मीच कागदपत्रे सार्वजनिक करण्यात आली आहेत आणि उर्वरित ५० टक्के माहिती अद्यापही दडपली जात आहे. मात्र, न्याय विभागाने पीडितांच्या गोपनीयतेचे कारण देत काही भाग वगळल्याचे स्पष्ट केले आहे.
एप्सटिन हा राजकीयद़ृष्ट्या प्रभावशाली होता. त्याचे माध्यमे, वित्त, राजकारण, मनोरंजन आणि इतर उद्योगांतील उच्चभ्रू लोकांशी संबंध होते. तो दीर्घकाळ गंभीर कायदेशीर परिणाम टाळू शकला होता. दस्तऐवजांतून स्पष्ट होते की, एफबीआयकडे 1996 मध्येच एप्सटिनविरोधात तक्रार आली होती. ही तक्रार करणार्या मारिया फार्मर यांनी सांगितले आहे की, फेडरल अधिकार्यांनी त्यांच्या तक्रारीचा पाठपुरावा केला नाही.