

वॉशिंग्टन डी.सी.; वृत्तसंस्था : अमेरिकेत जन्म घेणार्या प्रत्येक नवजात बाळाच्या भविष्यासाठी सरकार थेट आर्थिक गुंतवणूक करणार असून, त्या अंतर्गत 1000 डॉलर (सुमारे 92 हजार रुपये) दिले जाणार आहेत. ही रक्कम बाळाच्या नावाने उघडल्या जाणार्या एका विशेष खात्यात जमा केली जाईल. या योजनेला ‘ट्रम्प अकाऊंट’ असे नाव दिले आहे. व्हाईट हाऊसच्या माहितीनुसार, हे खाते करमुक्त बचत खाते असेल. या खात्यातील रक्कम शेअर बाजारात गुंतवली जाईल, जेणेकरून दीर्घकालीन गुंतवणुकीतून भांडवल वाढू शकेल.
दि. 1 जानेवारी 2025 ते दि. 31 डिसेंबर 2028 या कालावधीत अमेरिकेत जन्मलेल्या मुलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. यामुळे दरवर्षी सुमारे 36 लाख नवजात बाळांना आर्थिक मदत मिळेल.
या खात्यातील रक्कम मुलाचे वय 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतरच काढता येईल. ही रक्कम उच्च शिक्षण, व्यवसाय सुरू करणे, घर खरेदी किंवा इतर महत्त्वाच्या गरजांसाठी वापरता येणार आहे. सरकारच्या 1000 डॉलर व्यतिरिक्त या खात्यात दरवर्षी कमाल 5000 डॉलर जमा करता येतील. 4 जुलैपासून कुटुंबांना ट्रम्प अकाऊंटमध्ये रक्कम जमा करता येईल.
योजनेबाबत बोलताना ट्रम्प म्हणाले, आजपर्यंतच्या सरकारांनी पुढील पिढीला फक्त कर्ज दिले. आमचे सरकार मात्र प्रत्येक बाळाला खरी संपत्ती आणि आर्थिक स्वातंत्र्य असलेली सुरुवात देत आहे.
जेपी मॉर्गन चेस, बँक ऑफ अमेरिका यांनी जाहीर केले की, ते आपल्या कर्मचार्यांच्या मुलांच्या ट्रम्प अकाऊंटमध्ये सरकारप्रमाणेच 1000 डॉलरची समतुल्य रक्कम जमा करतील. इंटेलनेही अशाच प्रकारची घोषणा केली असून, व्हिसा कंपनीने क्रेडिट कार्डधारकांना रिवॉर्ड पॉईंटद्वारे ट्रम्प अकाऊंटमध्ये रक्कम जमा करण्याची मुभा दिली आहे. डेल टेक्नॉलॉजीजचे सीईओ मायकेल डेल आणि त्यांची पत्नी सुसान डेल यांनी 2.5 कोटी अमेरिकी मुलांसाठी प्रत्येकी 250 डॉलर देण्याची घोषणा केली असून, त्याची एकूण रक्कम 6.25 अब्ज डॉलर इतकी आहे. ब्लॅकरॉक, चार्ल्स श्वाब, बीएनवाय, चार्टर कम्युनिकेशन्स यांसारख्या दिग्गज कंपन्यांनीही या योजनेला पाठिंबा दर्शवला आहे.