

Sakurajima Volcano Eruption: जपानच्या कागोशिमा प्रदेशातील सकुराजिमा ज्वालामुखीचा रविवारी पहाटे भीषण उद्रेक झाला, ज्यामुळे आकाशात तब्बल 4,400 मीटर उंच राख, धूर आणि आगीचे प्रचंड लोळ उसळले. लालसर दगड आणि चिंगाऱ्या हवेत वेगाने उडताना दिसल्या आणि काही क्षणांत संपूर्ण परिसर राखेच्या धुक्यात गायब झाला. हे दृश्य पाहताना क्षणभर एखाद्या चित्रपटातील दृश्य वाटावे, पण ही जपानच्या जगप्रसिद्ध ज्वालामुखीची खरी परिस्थिती आहे. सकुराजिमा हा जपानमधील सर्वाधिक सक्रिय ज्वालामुखींमध्ये गणला जातो आणि त्याची हालचाल जवळपास वर्षभर सुरूच असते.
समोर आलेल्या व्हिडिओमध्ये काळ्या राखेचे प्रचंड ढग 4 किमीपेक्षा जास्त उंचीवर जाताना दिसत आहेत. गेल्या वर्षी ऑक्टोबरनंतरचा हा सर्वात मोठा स्फोट समजला जात आहे. स्फोटाच्या तीव्रतेमुळे लालसर दगड आणि चिंगाऱ्या ‘फिफ्थ स्टेशन’पर्यंत उडून गेल्या. संपूर्ण डोंगर राखेच्या धुरात हरवून गेला होता आणि आकाशात उडणारी ज्वाला स्पष्ट दिसत होती.
क्योडो न्यूजच्या माहितीनुसार, सकुराजिमाच्या सतत सुरू असलेल्या स्फोटांमुळे 4,400 मीटर उंच राखेचा ढग तयार झाला. या उद्रेकानंतरही ज्वालामुखी शांत न झाल्याने कागोशिमा, कुमामोटो आणि मियाझाकी प्रांतांमध्ये राख पडण्याचा इशारा हवामान विभागाने दिला. महत्वाचे म्हणजे, कोणतीही जीवितहानी झाली नाही. इमारती किंवा घरांना मोठे नुकसान झाल्याचीही माहिती नाही.
स्थानिक हवामान खात्याच्या माहितीनुसार मिनामिडाके क्रेटरमध्ये दुपारी 12:57 वाजता झालेल्या स्फोटामुळे गेल्या वर्षी ऑक्टोबरनंतर प्रथमच धूर 4,000 मीटरच्या पुढे पोहोचला.
मोठे दगड उडून गेल्याचे दिसले, मात्र पायरोक्लास्टिक फ्लो (अत्यंत धोकादायक गरम लाव्हा-धुराचे प्रवाह) झाल्याची नोंद नाही. सध्या रिस्क लेव्हल 3 वर कायम असून या भागात सामान्य नागरिकांना प्रवेशबंदी आहे.
सकुराजिमा हा जपानमधील सर्वात सक्रिय आणि ज्वलनशील ज्वालामुखी मानला जातो.
कधीकाळी तो पूर्णपणे स्वतंत्र बेट होते. परंतु 1914 मधील प्रचंड लाव्हा प्रवाहामुळे हा भाग क्यूशू बेटाच्या ओसुमी द्वीपकल्पाशी जोडला गेला. तेव्हापासून हा पर्वत दिसायला स्थिर वाटला तरी त्याच्या आत सतत ज्वालामुखीची हालचाल सुरू असते. जपानमध्ये सुमारे 110 सक्रिय ज्वालामुखी आहेत, पण सकुराजिमा त्यातील सर्वांत सक्रिय मानला जातो.