

Israel Iran Conflict Tehran Explosions Middle East Tension: पश्चिम आशियातील तणाव आणखी वाढला आहे. इस्रायलने इराण विरोधात प्रिव्हेंटिव्ह अटॅक म्हणजेच संभाव्य धोक्याला आळा घालण्यासाठी लष्करी कारवाई सुरू केल्याची माहिती इस्रायली संरक्षण मंत्र्यांनी दिली आहे. या कारवाईनंतर इस्रायलने देशभरातील नागरिकांसाठी अलर्ट जारी करत सायरन वाजवले, जेणेकरून संभाव्य प्रतिहल्ल्याच्या पार्श्वभूमीवर लोक सुरक्षित ठिकाणी जाऊ शकतील.
दरम्यान, इराणची राजधानी तेहरान येथे जोरदार स्फोट झाल्याच्या बातम्या स्थानिक माध्यमांनी दिल्या आहेत. राजधानीच्या मध्यवर्ती भागात किमान तीन स्फोट ऐकू आल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. मात्र, इराणी अधिकाऱ्यांनी अद्याप अधिकृतरीत्या हल्ल्याची माहिती दिली नाही किंवा नुकसानाबाबत तपशील दिलेला नाही.
अशा प्रकारची कारवाई साधारणपणे संभाव्य धोका टाळण्यासाठी केली जाते. इस्रायली लष्कराने आपल्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून, संभाव्य इराणी क्षेपणास्त्र हल्ल्याची शक्यता लक्षात घेऊन खबरदारी घेण्यात येत आहे.
तेहरानमधील स्फोटांनंतर परिस्थिती तणावपूर्ण बनली आहे. स्थानिक माध्यमांनुसार, स्फोटांनंतर आकाशात धुराचे लोट दिसत होते. तरीही अधिकृत तपशील अद्याप समोर आलेला नाही.
ही घटना अशा वेळी घडली आहे, जेव्हा इराण आणि अमेरिका यांच्यात अणुकरारा संदर्भात चर्चा सुरू होती. अलीकडेच जिनिव्हा येथे दोन्ही देशांमध्ये तिसऱ्या फेरीची चर्चा झाली होती आणि पुढील चर्चेचा टप्पाही प्रस्तावित होता. या पार्श्वभूमीवर लष्करी कारवाईमुळे अणुकराराच्या प्रयत्नांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी यापूर्वी इराणला धोकादायक असे संबोधले होते. वाढत्या सुरक्षेचा धोका लक्षात घेऊन अमेरिकेने इस्रायलमधील काही दूतावास कर्मचाऱ्यांना परतण्याची परवानगी दिल्याची माहितीही समोर आली आहे.
पश्चिम आशियात आधीच संघर्ष आणि राजकीय अस्थिरता आहे. इस्रायलच्या या कारवाईनंतर परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. आता सर्वांचे लक्ष इराणच्या संभाव्य प्रत्युत्तराकडे आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील हालचालींकडे लागले आहे.