

टोरखाम, इस्लामाबाद, काबूल : वृत्तसंस्था; अफगाणिस्तानच्या तालिबान फौजांनी पाकिस्तानच्या सीमावर्ती लष्करी छावण्यांवर गुरुवारी रात्री जोरदार आक्रमण केले. त्यांनी सुमारे 55 पाकिस्तानी सैनिकांना कंठस्नान घातले आणि अनेक चौक्या ताब्यात घेतल्या. अचानक झालेल्या या हल्ल्याने भांबावलेल्या पाकिस्तानी सैन्याने शुक्रवारी काबूलसह अनेक शहरांतील तालिबानच्या सैन्य तळावर हवाई हल्ले केले. त्यानंतर अफगाणिस्तानने ड्रोनने पाकिस्तानी सैन्याच्या लष्करी मुख्यालयावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो ड्रोन मुख्यालयाच्या जवळच पाडण्यात आला. पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी अफगाणिस्तानशी पूर्ण युद्ध सुरू झाल्याची घोषणा केली आहे.
पाकिस्तानने शुक्रवारी अफगाणिस्तानची राजधानी काबूल तसेच आणखी दोन प्रांतांवर बॉम्बहल्ले केले. सीमापार झालेल्या हल्ल्यानंतर काही तासांतच ही कारवाई करण्यात आली. 2025 मध्ये कतारच्या मध्यस्थीने दोन्ही देशांमध्ये शस्त्रसंधी झाली असली, तरी अस्थिर शेजारी देशांमधील हिंसाचारात ही ताजी वाढ आहे. गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या प्रत्युत्तरात्मक चकमकीनंतर गुरुवारी रात्री अफगाण सैन्याने पाकिस्तानी सीमारेषेवरील जवानांवर हल्ला केला. तालिबान सरकारने हा हल्ला यापूर्वी झालेल्या प्राणघातक हवाई हल्ल्यांचा बदला असल्याचे सांगितले. काही तासांतच काबूलमध्ये किमान तीन स्फोटांचे आवाज ऐकू आले. दोन्ही देशांनी मृतांची संख्या आणि लक्ष्य केलेल्या ठिकाणांबाबत वेगवेगळे दावे केले आहेत.
पाकिस्तानचे माहिती व प्रसारण मंत्री अत्ताउल्ला तरार यांनी दावा केला की काबूल, पक्तिया आणि कंदहार येथे झालेल्या हल्ल्यांत 133 अफगाण तालिबान अधिकारी ठार झाले आणि 200 हून अधिक जखमी झाले. आणखी मृत्यू झाल्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी पाकिस्तानचे सशस्त्र दल आक्रमकांना चिरडून टाकू शकतात असे म्हटले, तर संरक्षणमंत्र्यांनी उघड युद्ध घोषित केले. संरक्षणमंत्री ख्वाजा मोहम्मद आसिफ यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले की, नाटो सैन्य माघारी गेल्यानंतर अफगाणिस्तानात शांततेची अपेक्षा होती; मात्र तालिबानने जगभरातील दहशतवाद्यांना एकत्र करून दहशतवादाची निर्यात सुरू केली, असा आरोप त्यांनी केला. आता आमचा संयम संपला आहे. हे आमच्यातील उघड युद्ध आहे, असे ते म्हणाले.
संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी दोन्ही देशांना आंतरराष्ट्रीय कायद्याप्रमाणे नागरिकांचे संरक्षण करण्याचे आणि मतभेद राजनैतिक मार्गाने सोडवण्याचे आवाहन केले. पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात 2,611 किमी लांबीची ड्युरंड रेषा आहे, ज्याला अफगाणिस्तानने औपचारिक मान्यता दिलेली नाही. टोरखाम सीमेवरील निर्वासित छावणी रिकामी करण्यात येत असून अनेक नागरिक सुरक्षित ठिकाणी हलवले जात आहेत. गेल्या काही महिन्यांपासून दोन्ही देशांतील तणाव वाढलेला असून ऑक्टोबरमधील चकमकीत दोन्ही बाजूंचे 70 हून अधिक लोक मृत्युमुखी पडले होते.
अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यातील महत्त्वाच्या टोरखाम सीमा चौकीजवळील चकमकी शुक्रवारी पुन्हा सुरू झाल्या. दोन्ही शेजारी देशांमध्ये झालेल्या या संघर्षात जीवितहानी झाली आहे, असे एएफपीच्या वृत्तात म्हटले आहे. रात्री उशिरा झालेल्या हिंसाचारात पाकिस्तानमधून नुकतेच अफगाणिस्तानात परतलेल्या लोकांच्या तळावर हल्ला झाला असून अनेकजण जखमी झाले आहेत. काही काळ शांतता होती; मात्र सकाळी सुमारे 9.30 वाजता अफगाण बाजूला सीमापार तोफगोळ्यांचा आवाज ऐकू आला आणि त्यानंतर पुन्हा चकमकी सुरू झाल्या. त्याने अफगाण सैनिकांना सीमेकडे जाताना या पत्रकाराने पाहिले, मात्र सुरक्षा दलांनी त्याला परिसर सोडण्यास सांगितले.
ऑक्टोबरमध्ये झालेल्या संघर्षानंतर जमीनमार्गाने सीमा बहुतांश बंद असली तरी पाकिस्तानमधून मोठ्या प्रमाणावर परतणार्या अफगाण नागरिकांसाठी टोरखाम सीमा चौकी खुली ठेवण्यात आली आहे. सीमेजवळील परतणार्यांसाठी उभारण्यात आलेल्या ओमारी तळावर रात्री मोर्टार हल्ला झाला, अशी माहिती नंगरहार प्रांतातील अधिकार्यांनी दिली.
दुर्दैवाने आमचे सात निर्वासित जखमी झाले असून एका महिलेची प्रकृती गंभीर आहे, असे नंगरहारचे माहितीप्रमुख कुरेशी बादलुन यांनी सांगितले. 65 वर्षीय गंदर खान यांनी सांगितले की, मुले, महिला आणि वृद्ध लोक पळत होते. मी रक्त पाहिले. दोन-तीन मुले आणि दोन-तीन महिला जखमी झाल्या. 44 वर्षीय झरघोन यांनी सांगितले की, गोंधळात दोन-तीन मुले बेपत्ता झाली. काहींनी आपली कागदपत्रे तसेच सोडली आणि पळ काढला. त्यांनी पैसेही घेतले नाहीत, मदतीचे साहित्यही घेतले नाही. भीतीमुळे सगळे पळाले, असे त्यांनी सांगितले. जालालाबाद येथेे ओमारी तळावर जखमी झालेल्या काही महिलांवर उपचार सुरू असल्याचे पाहिले. तालिबान प्रशासनाने सांगितले की, काही दिवसांपूर्वी पाकिस्तानकडून झालेल्या हवाई हल्ल्यांच्या प्रत्युत्तरादाखल अफगाण सैन्याने गुरुवारी उशिरा सीमेलगत पाकिस्तानी सैन्यावर कारवाई केली. त्यानंतर पाकिस्तानने अफगाणिस्तानची राजधानी काबूल आणि कंदहार या महत्त्वाच्या शहरांवर हवाई हल्ले केले.
पाकिस्तानी अधिकार्यांच्या मते, पाकिस्तानने काबूलसह कंदहार आणि पक्तिया प्रांतात हवाई हल्ले केले. हे हल्ले अफगाण सीमापार कारवायांच्या प्रत्युत्तरात केल्याचा पाकिस्तानचा दावा आहे. काही महिन्यांपूर्वी कतार आणि तुर्की यांच्या मध्यस्थीने दोन्ही देशांत शस्त्रसंधी झाली होती.