

पुढारी ऑनलाईन डेस्क : गाझामध्ये इस्रायलकडून मोठा हवाई हल्ला करण्यात आला आहे. यावेळी इस्रायलने गाझामधील शाळेतील विस्थापित लोकांना लक्ष्य केले. या हल्ल्यात १०० हून अधिक पॅलेस्टिनी नागरिक ठार झाले, तर अनेक जण जखमी झाले आहेत. लोक प्रार्थना करत असताना हा स्ट्राइक झाल्याचा दावा गाझा सरकारी मीडिया कार्यालयाने एका निवेदनात केला आहे.
हमास संचालित मीडिया कार्यालयाने निवेदनात म्हटले आहे की, इस्रायलने विस्थापित लोक सकाळची प्रार्थना करत असताना लक्ष्य केले. त्यामुळे मृतांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली. इस्रायलच्या वायुसनेने मात्र हमास कमांड आणि कंट्रोल सेंटरमध्ये कार्यरत असलेल्या हमासच्या दहशतवाद्यांवर अचूकपणे हल्ला केल्याचे म्हटले आहे. हे सेंटर अल-तबाइन शाळेमध्ये गाझा शहरातील रहिवाशांसाठी आश्रयस्थान म्हणून काम करणाऱ्या दराज तुफाह येथील मशिदीला लागून होते, असे इस्रायलने म्हटले आहे.
गेल्या आठवड्यात गाझामध्ये चार शाळांवर हल्ला करण्यात आला होता. ४ ऑगस्ट रोजी गाझा शहरातील विस्थापित लोकांसाठी आश्रयस्थान म्हणून काम करणाऱ्या दोन शाळांवर इस्रायली हल्ल्यात ३० लोक ठार आणि अनेक जखमी झाले होते. यापूर्वी गाझा शहरातील हमामा शाळेवर इस्रायलने केलेल्या हल्ल्यात १७ जण ठार झाले होते. १ ऑगस्ट रोजी दलाल अल-मुगराबी शाळेवर इस्रायली हल्ल्यात १५ लोक मारले गेले. इस्रायलचा दावा आहे की, कंपाऊंडमध्ये दहशतवादी आहेत जे हमास कमांड कंट्रोल सेंटर म्हणून काम करत आहेत.