

Iran US War Update: पश्चिम आशियाच्या १८ दिवसांच्या शस्त्रसंधीनंतर आता पुन्हा होर्मुझ आणि युएईमध्ये ड्रोन अन् मिसाईल अटॅक सुरू झाले आहेत. होर्मुझमध्ये अमेरिकेने इराणच्या नागरी जहाजावर हल्ला केल्याचा दावा इराणी मीडियाने केला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अमेरिकी सैन्याने इराणच्या दिशेने सामान घेऊन जाणाऱ्या दोन नागरी नौकांवर हल्ला केला. इराणच्या म्हणण्यानुसार या नौका आयआरजीसी स्पीडबोट्स नव्हत्या. त्या सामान्य मालवाहू नौका होत्या. या नौकांमधील ५ नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
दुसरीकडे अमेरिकेने इराणच्या या दाव्यावर सध्या तरी कोणताही प्रतिक्रिया दिलेली नाही. होर्मुझ स्ट्रेटमधून व्यापारी जहाजांना काढण्याची मोहीम सुरू केली आहे. अमेरिकेच्या लष्कराच्या मते दोन अमेरिकेचा झेंडा लावलेली जहाजे यशस्वरित्या होर्मुझमधून पास झाली आहेत.
अमेरिकेने इराणचा दावा देखील खोडून काढला आहे. इराणने अमेरिकेच्या एका नेव्ही जहाजावर हल्ला केल्याचा दावा केला होता. अमेरिकेने हा एक कल्पनाविलास असल्याचं म्हटलं आहे.
बहरीनमध्ये आज रात्री राष्ट्रीय आपत्कालीन स्थिती जाहीर करण्यात आली. संयुक्त अरब अमीरातने सोमवारी सांगितलं की एका इराणी ड्रोनने फुजैराहमधील तेल साठ्याला आग लावली. हे केंद्र होर्मुझ स्ट्रेटला बायपास करणाऱ्या एका महत्वपूर्ण पाईपलाईन हब आहे. यानंतर ब्रिटीश लष्कराने देखील अमीरातच्या समुद्र किनाऱ्यावर एका मालवाहू जहाजाला आग लागल्याची माहिती दिली. या हल्ल्यानंतर ग्लोबल मार्केटमध्ये तेलाच्या किंमती ६ टक्क्यांनी वाढल्या.
इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची यांनी मात्र या हल्ल्यामागे इराणचा हात असल्याचा नकार दिला. त्यांनी अमेरिका आणि युएईच्या दलदलीत पुन्हा जाण्यापासून वाचलं पाहिजे अशी प्रतिक्रिया दिली. या राजनैतिक संकटावर लष्करी समाधान निघू शकत नाही हा प्रश्न फक्त वाटाघाटीद्वारेच सोडवला जाऊ शकतो असं देखील मत त्यांनी व्यक्त केलं.
ते आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहितात, 'होर्मुझमध्ये झालेल्या घटनांवरून हे स्पष्ट होतं की कोणत्याही राजनैतिक संकटाचे लष्करी समाधान होऊ शकत नाही. पाकिस्तानच्या प्रयत्नांमुळे गोष्टी पुढे सरकत आहेत. काही वाईट हेतू ठेवणारे लोक त्यांना पुन्हा अमेरिकेला दलदलीत ओढण्याचा प्रयत्न करतील. अमेरिकेला आता या गोष्टीपासून सावधान राहिल पाहिजे. युएईला देखील या आता गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. प्रोजेक्ट फ्रीडम खरं तर प्रोजेक्ट डेडलॉक आहे.'