Iran Melania Trump threat
वॉशिंग्टन: अमेरिका आणि इराण यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, इराणकडून एक धक्कादायक आणि खळबळजनक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पत्नी व फर्स्ट लेडी मेलानिया ट्रम्प तसेच त्यांचा २० वर्षांचा मुलगा बॅरो ट्रम्प यांना थेट निशाण्यावर धरण्यात आले असून, त्यांना विष देऊन मारण्याची धमकी देण्यात आली आहे.
मेलानिया ट्रम्प यांची हत्या कशी करावी? या शीर्षकाने प्रसारित करण्यात आलेल्या या व्हिडिओमध्ये इराण समर्थकांना मेलानिया यांच्यावर हल्ला करण्यासाठी फितवले जात आहे. या व्हिडिओत मेलानिया यांच्या ताफ्याचे फोटो, तसेच न्यूयॉर्क शहरातील त्या वारंवार भेट देत असलेल्या ठिकाणांची व आवडत्या डिझायनर स्टोअर्सची माहिती दाखवण्यात आली आहे.
सर्वात धक्कादायक म्हणजे, फर्स्ट लेडी ज्या स्टोअर्समधून कपड्यांची खरेदी करतात, त्या कपड्यांवर विष लावून त्यांची हत्या करण्याचा सल्ला या व्हिडिओद्वारे देण्यात आला आहे. व्हिडिओच्या शेवटी ट्रम्प यांचा मुलगा बॅरो याला धमकी देत, "ही तर फक्त सुरुवात आहे, बॅरो ट्रम्प आमची वाट पाहा" असा इशारा देण्यात आला आहे.
इराणकडून ट्रम्प कुटुंबाला लक्ष्य करण्याची ही पहिलीच वेळ नाही. गेल्याच आठवड्यात इराणची राजधानी तेहरानमध्ये मोठमोठे होर्डिंग्ज लावण्यात आले होते. त्यावर ट्रम्प यांच्यासह त्यांची सर्व मुले, डॉन ज्युनियर, इव्हांका, एरिक, टिफनी आणि बॅरो यांच्या मृत्यूची मागणी करण्यात आली होती. या पोस्टर्सवर 'खून का बदला खून से' असा धमकीचा संदेश लिहिण्यात आला होता.
या गंभीर धमक्यांच्या पार्श्वभूमीवर मेलानिया आणि बॅरो ट्रम्प यांच्या सुरक्षेत प्रचंड वाढ करण्यात आली असून, त्यांना २४ तास 'सीक्रेट सर्व्हिस'चे कडेकोट संरक्षण देण्यात आले आहे. याशिवाय व्हाइट हाउस, न्यूयॉर्कमधील ट्रम्प टॉवर, न्यू जर्सीतील बेडमिन्स्टर गोल्फ क्लब आणि फ्लोरिडा येथील मार-ए-लागो एस्टेट या ट्रम्प यांच्या सर्व महत्त्वाच्या ठिकाणांवर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे.
केवळ ट्रम्प यांचे कुटुंबच नव्हे, तर खुद्द डोनाल्ड ट्रम्प हेदेखील इराणच्या निशाण्यावर आहेत. अलीकडेच तुर्किए येथे झालेल्या 'नाटो' बैठकीदरम्यान सुरक्षेच्या कारणास्तव ट्रम्प यांना त्यांचे नवीन 'एयर फोर्स वन' विमान सोडून जुन्या मॉडेलच्या विमानाने प्रवास करावा लागला होता.