

Iran hit list world leaders : इराणचे दिवंगत सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या निधनानंतर, त्यांचे पुत्र आणि उत्तराधिकारी मोजताबा खामेनी यांनी वडिलांच्या अंत्यसंस्कारांनंतर पहिल्यांदाच जाहीर संबोधन केले. या वेळी त्यांनी १३ जागतिक नेत्यांची नावे असलेली एक 'बदला घेणार यादी' जाहीर केली असल्याचे वृत्त 'एएनआय'ने दिले आहे.
शनिवारी उशिरा इराणमधील 'हमशहरी' या राष्ट्रीय दैनिकाने ही 'बदल्याची यादी' ऑनलाइन प्रकाशित केली. यात १३ परदेशी नेत्यांची नावे असून, खामेनी यांच्या निधनानंतर त्यांना लक्ष्य म्हणून दर्शवण्यात आले आहे. गेल्या आठवड्यात वडिलांच्या सहा दिवस चाललेल्या अंत्यसंस्कारांच्या प्रक्रियेनंतर, मोजताबा खामेनी यांचा हा पहिलाच जाहीर संदेश होता.
इराण आणि पाश्चात्य देशांमधील वाद आता अत्यंत धोकादायक आणि वैयक्तिक पातळीवर पोहोचला आहे. तेहरान नगरपालिकेकडून चालवल्या जाणाऱ्या 'हमशहरी' या इराणमधील एका पुराणमतवादी आणि कट्टरपंथी वृत्तपत्राने आपल्या वेबसाईटवर एक अत्यंत वादग्रस्त 'टार्गेट लिस्ट' जारी केली आहे. या यादीमध्ये अमेरिका, इस्रायल आणि अनेक युरोपीय देशांतील १३ मोठ्या जागतिक नेत्यांच्या फोटोंचा समावेश आहे. इराणचे माजी सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या मृत्यूला हे नेते जबाबदार असल्याचा दावा करत, त्यांना 'निशाणा' बनवण्याबाबत यात म्हटले आहे.हे पाऊल इराणचे नवे सर्वोच्च नेते आणि दिवंगत अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा खामेनेई यांच्या त्या विधानानंतर लगेचच समोर आले आहे, ज्यामध्ये त्यांनी आपल्या वडिलांच्या हत्येचा बदला घेण्याची खुली शपथ घेतली होती.
याच वर्षी २८ फेब्रुवारी रोजी मध्य पूर्व युद्धाच्या पहिल्याच दिवशी अमेरिका आणि इस्रायलच्या संयुक्त हवाई हल्ल्यात अयातुल्ला अली खामेनेई मारले गेले होते. तेव्हापासून त्यांचे पुत्र मोजतबा खामेनेई यांनी देशाची धुरा सांभाळली आहे, मात्र ते सार्वजनिकरित्या समोर आलेले नाहीत. या हल्ल्यात ते स्वतः देखील जखमी झाले होते, असे म्हटले जात आहे.आपल्या वडिलांच्या अंत्यसंस्कारानंतर शनिवारी जारी केलेल्या पहिल्या लेखी संदेशात मोजतबा यांनी म्हटले, "बदला ही आमच्या संपूर्ण देशाची इच्छा आहे आणि तो नक्कीच घेतला जाईल. हे गुन्हेगार, ज्यांची नावे या यादीत समाविष्ट आहेत, ते आपल्या अंथरुणावर शांततेत मरणे ही इच्छा आपल्यासोबतच थडग्यात घेऊन जातील."
मोजतबा खामेनेई यांनी आपल्या अधिकृत संदेशात कोणत्याही नेत्याचे नाव थेट घेतले नव्हते आणि सरकारनेही अशा कोणत्याही यादीला दुजोरा दिलेला नाही. मात्र, 'हमशहरी' वृत्तपत्राने मोजतबा यांच्या विधानानंतर लगेचच रात्री उशिरा इंटरनेटवर १३ जागतिक नेत्यांची यादी प्रसिद्ध केली.खालील तक्त्यामध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना थेट बंदुकीच्या निशाण्यावर दाखवण्यात आले आहे, तर उर्वरित नेत्यांना कैद्यांच्या गणवेशात दाखवले आहे.
अमेरिका: राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो, संरक्षण मंत्री पीट हेगसेथ
इस्रायल : पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू, संरक्षण मंत्री इस्रायल काट्झ, गिदोन सार
ब्रिटन : पंतप्रधान कीर स्टार्मर
फ्रांस :राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन
इटली :पंतप्रधान जिओर्जिया मेलोनी
जर्मनी :चान्सलर फ्रेडरिक मर्ज
विशेष म्हणजे, ही 'हिट लिस्ट' केवळ वृत्तपत्राच्या ऑनलाईन आवृत्तीवर प्रसिद्ध करण्यात आली होती, रविवारच्या छापील (प्रिंट) आवृत्तीत याचा समावेश करण्यात आला नव्हता.
या युद्धादरम्यान इराण युरोपीय देशांवर प्रचंड संतप्त आहे. ब्रिटन, फ्रान्स आणि जर्मनीसारख्या देशांनी इराणच्या सार्वभौमत्वावर झालेल्या हल्ल्यांचा केवळ निषेधच केला नाही, तर अमेरिकेच्या युद्धनौका आणि विमानांना आपल्या हवाई क्षेत्राचा वापर करण्याची परवानगी देऊन ते या हत्येमध्ये आणि हल्ल्यांमध्ये बरोबरीचे भागीदार राहिले आहेत, असा आरोप तेहरानने केला आहे.ही 'हिट लिस्ट' अशा वेळी समोर आली आहे, जेव्हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतीच इराणला त्यांच्या हत्येच्या कोणत्याही कटाविरुद्ध अत्यंत कडक शब्दांत चेतावणी दिली होती. दुसरीकडे, १७ जून रोजी झालेली युद्धबंदी पूर्णपणे मोडीत निघाल्यानंतर दोन्ही बाजूंनी एकमेकांवर थेट हल्ले केले जात आहेत, ज्यामुळे संपूर्ण भागात पुन्हा एकदा पूर्ण क्षमतेने युद्ध भडकण्याचा धोका निर्माण झाला आहे.