

Indian Vlogger Detained in China: ‘ऑन रोड इंडियन’ या नावाने ओळखला जाणारा भारतीय व्लॉगर अनंत मित्तल याला चीनमध्ये तब्बल 15 तास ताब्यात ठेवल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या काळात त्याला ना व्यवस्थित पाणी दिलं गेलं, ना खायला काही दिलं. अरुणाचल प्रदेशासंदर्भात केलेल्या एका व्हिडिओमुळे हा प्रकार घडल्याचा दावा अनंत मित्तल यांनी केला आहे.
ही घटना 16 नोव्हेंबर रोजी घडली. चीनमध्ये एन्ट्री करताच इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी अनंत मित्तल यांना थांबवलं. त्यांच्या पासपोर्टवर एक स्टिकर लावण्यात आला आणि लगेचच सिस्टीममध्ये अलर्ट वाजल्याचं त्यांनी सांगितलं. त्यानंतर त्यांना इतर काही परदेशी नागरिकांसोबत एका ठिकाणी बसवण्यात आलं.
अनंत मित्तल यांनी सांगितलं की, सुरुवातीचे दोन तास कोणत्याही अधिकाऱ्याने त्यांच्याशी संवाद साधला नाही. तेव्हा परिस्थिती किती गंभीर आहे, याची जाणीव झाली. त्यानंतर त्यांना वेगळ्या खोलीत नेण्यात आलं आणि त्यांचा मोबाइल फोन व कॅमेरा जप्त करण्यात आला, जेणेकरून ते काहीही रेकॉर्ड करू शकणार नाहीत.
ताब्यात असताना त्यांनी अनेकदा पाणी आणि जेवण मागितलं. पण काही तासांनंतर एकदाच पाणी देण्यात आलं, मात्र जेवण मात्र दिलंच नाही. अशा स्थितीत 12 ते 13 तास कसे गेले, हेही कळलं नाही, असं त्यांनी सांगितलं.
अनंत मित्तल यांचं म्हणणं आहे की, त्यांनी ईशान्य भारतात तीन वर्षं शिक्षण घेतलं आहे आणि त्या भागाशी त्यांचा भावनिक संबंध आहे. अरुणाचल प्रदेशातील एका नागरिकाला चीनमध्ये ताब्यात घेतल्याची बातमी ऐकून त्यांनी त्यावर व्हिडिओ बनवला होता. याच व्हिडिओमुळे आपल्यावर ही कारवाई झाल्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.
आपल्या व्हिडिओत अनंत मित्तल यांनी स्पष्ट केलं आहे की, त्यांचा कोणत्याही राजकीय पक्षाशी किंवा अजेंड्याशी संबंध नाही. “माझ्या मनात कोणाबद्दल द्वेष नाही. मी फक्त माझ्या नजरेतून जग दाखवतो,” असं ते म्हणाले. कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर माफी मागायलाही ते तयार असल्याचं त्यांनी सांगितलं.
या घटनेनंतर अखेर त्यांची सुटका झाली आहे आणि ते सुरक्षितपणे भारतात परतले आहेत. संपूर्ण अनुभव त्यांनी आपल्या युट्यूब चॅनलवर व्हिडिओद्वारे सांगितला आहे. “आपण फार छोटे लोक आहोत, मोठ्या शक्तींसमोर आपली काहीच लायकी नाही,” असं भावनिक वक्तव्य त्यांनी केलं. या घटनेमुळे सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू असून, परदेशात भारतीय नागरिकांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.