

India Pakistan UNSC
नवी दिल्ली : संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेमध्ये (UNSC) भारताने पाकिस्तानवर जोरदार शब्दांत टीका केली. भारताचे संयुक्त राष्ट्रांतील स्थायी प्रतिनिधी परवथनेनी हरीश यांनी पाकिस्तानला "दहशतवादात बुडालेला आणि आयएमएफकडून सातत्याने कर्ज घेणारा देश" म्हणून संबोधले.
त्यांनी यावेळी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख करत भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर' चे समर्थन केले.
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेमध्ये शांतता आणि बहुपक्षीय सहकार्य या विषयावर झालेल्या उच्चस्तरीय चर्चेत बोलताना हरीश म्हणाले, “भारतीय उपखंडामध्ये विकास आणि समावेशाचे दोन टोकाची मॉडेल्स पाहायला मिळतात.
एकीकडे भारत आहे — एक परिपक्व लोकशाही, प्रगतीशील अर्थव्यवस्था आणि बहुपंथीय समाज; तर दुसरीकडे पाकिस्तान आहे — अंधश्रद्धा, दहशतवाद आणि आर्थिक अराजकतेत गुरफटलेला देश."
परवथनेनी हरीश यांनी स्पष्ट केलं की, 22 एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 निष्पाप नागरिकांचे बळी गेले. त्या घटनेनंतर भारताने 7 मे रोजी ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवले, जे पाकिस्तान व पाकिस्तानव्याप्त जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी तळांवर केंद्रित होते.
"ही कारवाई मर्यादित, मोजकी आणि वाढीव संघर्ष टाळणारी होती," असं हरीश यांनी सांगितलं. “मुख्य उद्दिष्ट पूर्ण झाल्यानंतर पाकिस्तानच्या विनंतीनुसार सैनिकी कारवाया थांबवण्यात आल्या,” त्यांनी स्पष्ट केलं.
या कारवाईदरम्यान काही सीमाभागांवर गोळीबाराच्या घटना घडल्या, मात्र 10 मे रोजी युद्धविराम घोषित करण्यात आला.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत-पाकिस्तान दरम्यान शांततेसाठी मध्यस्थी केली असल्याचा दावा केला होता, त्यावर भारताने परस्पर चर्चेच्या माध्यमातून युद्धविराम साधल्याचे स्पष्ट केले.
हरीश यांनी संयुक्त राष्ट्रांमध्ये दहशतवाद आणि त्यास प्रोत्साहन देणाऱ्या राष्ट्रांवरही कठोर शब्दांत टीका केली. “दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या आणि धर्मांधतेच्या मार्गावर चालणाऱ्या राष्ट्रांनी आंतरराष्ट्रीय संबंधांचे तत्त्व पायदळी तुडवले आहे,” असं त्यांनी स्पष्ट केलं.
संयुक्त राष्ट्र सुरक्षापरिषदेच्या सुधारणेची गरज
"संयुक्त राष्ट्र स्थापनेला 80 वर्षे पूर्ण होत असताना, आपल्याला बहुपक्षीयतेच्या आणि शांततामूलक वाद निवारणाच्या उद्दिष्टांचा आढावा घेणे आवश्यक आहे," असं हरीश यांनी नमूद केलं. त्यांनी सुरक्षा परिषदेमध्ये प्रतिनिधित्वाच्या अभावावरही चिंता व्यक्त केली.
हरीश यांनी भारताची शांततेच्या मार्गावरची वचनबद्धताही अधोरेखित केली. "भारत हा संयुक्त राष्ट्रांचा संस्थापक सदस्य असून, आजवर शांतता राखण्यासाठी जगभरात सर्वाधिक शांतीसैन्य पाठवणारा देश आहे," असं त्यांनी सांगितलं.
"आंतरराष्ट्रीय स्थैर्य, समावेशकता आणि न्याय्य व्यवस्था यासाठी भारत सदैव कटिबद्ध राहील," असं स्पष्ट करत त्यांनी भाषणाची सांगता केली.