

Indian refuses German passport
बर्लिन: जर्मनीमध्ये जवळपास दशकभर वास्तव्यास असलेल्या भारतीय उद्योजक मयूर पांजा यांनी आपला भारतीय पासपोर्ट बदलण्यास नकार दिला आहे. याचा संबंध त्यांनी आपली स्वओळख, आपलेपणा आणि मूल्यांशी असलेल्या त्यांच्या नात्याशी जोडला आहे.
मयूर पांजा हे संशोधनासाठी जर्मनीला गेले. पॉप्युलेशन्स (Populations) नावाच्या कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) कंपनी यांनी ?स्थापन केली. सलग ९ वर्ष जर्मनीत वास्तव्य केल्यानंतर ते आता जर्मन पासपोर्टसाठी अर्ज करण्यास पात्र ठरले आहेत. तरीही त्यांनी जर्मन नागरिकत्व घेण्यास नकार दिला आहे. त्यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये स्पष्ट केले आहे की, मी नऊ वर्षांपासून जर्मनीमध्ये राहत आहे. गेल्या वर्षापासून ते नागरिकत्वासाठी पात्र आहेत, परंतु त्यांनी अर्ज न करण्याचा निर्णय घेतला. "मी स्वतःला जर्मन मानत नाही, त्यामुळे जर्मन नागरिकत्व घेणे मला योग्य वाटत नाही," असे त्यांनी म्हटले आहे. त्यांच्या मते, पासपोर्ट हे 'एक साधे दस्तऐवज' असले तरी ते व्यक्तीच्या ओळखीशी जोडलेले असते आणि त्यांची ओळख भारतीय आहे.
पांजा म्हणतात की, त्यांना जर्मनीचा इतिहास, भाषा आणि संस्कृतीची माहिती आहे, परंतु त्यांना त्यांच्याशी गहन आपुलकी वाटत नाही. बर्लिनच्या आंतरराष्ट्रीय वातावरणामध्ये आणि तांत्रिक तसेच वैज्ञानिक क्षेत्रांमध्ये ते आरामदायक असले तरी, याच्या बाहेर त्यांना पूर्णपणे 'घरी' असल्यासारखे वाटत नाही.
देशाबद्दलच्या आपुलकीबाबत उदाहरण देताना पांजा म्हणतात की, जर्मनी फुटबॉल सामना जिंकला किंवा हरला तरी त्यांना फारसा फरक पडत नाही, पण भारताने क्रिकेट विश्वचषक जिंकल्यास त्यांना प्रचंड आनंद होतो. ते स्वतःला जर्मनीचे 'मित्र' मानतात, परंतु त्या देशाचा 'भाग' मानत नाहीत. जर्मन नागरिक होण्याचा अर्थ जर्मन मूल्ये आणि आदर्शांशी स्वतःला जोडून घेणे आहे. ही अपेक्षा स्वाभाविक असली तरी, एक नवीन नागरिक म्हणून, शतकानुशतके जुन्या संस्कृतीने आपल्या इच्छेनुसार बदलण्याची अपेक्षा आपण करू शकत नाही, असेही त्यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले आहे.
"भारतात, माझे मत बहुमतापेक्षा वेगळे असले तरी, मला अजूनही खुलेपणाने स्वतःला व्यक्त करण्याची आणि बदलासाठी प्रयत्न करण्याची ताकद मिळते," असे पांजा म्हणाले. त्यांचा भारतीय पासपोर्ट त्यांच्या मुळांचे आणि ओळखीचे प्रतीक आहे. त्यांच्यासाठी, भारतीय नागरिकत्व कायम ठेवणे हा कोणताही कायदेशीर लाभ नसून, त्यांच्या खऱ्या ओळखीशी जोडलेले राहण्याचा मार्ग आहे, असेही पांजा यांनी स्पष्ट केले आहे.
भारतीय नागरिकत्व कायम ठेवण्याचे पांजा यांच्या निर्णयाबद्दल सोशल मीडियावरील युजर्सनी पांजा यांचे कौतुक केले आहे.एका युजरने टिप्पणी केली, "तुम्ही निश्चितच एक सभ्य व्यक्ती आहात." तर एकाने म्हटलं आहे की, "हा एक खूप वैयक्तिक निर्णय आहे आणि तो सार्वजनिकरित्या व्यक्त करण्यासाठी खूप धाडस लागते. कौतुकास्पद आहे."