

India US trade deal
वॉशिंग्टन : भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध एका नव्या उंचीवर पोहोचले असून, दोन्ही देशांमधील बहुप्रतिक्षित व्यापार करारावर लवकरच शिक्कामोर्तब होणार आहे. व्हाईट हाऊसने याला दुजोरा दिला असून, भारताला इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील महत्वाचा धोरणात्मक सहकारी असल्याचे म्हटले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदींशी खूप चांगले संबंध आहेत. त्यांच्यातील घनिष्ठ मैत्री भविष्यातही कायम राहील, असे व्हाईट हाऊसने स्पष्ट केले आहे.
व्हाईट हाऊसच्या प्रेस सचिव कॅरोलिन लेविट यांनी एका पत्रकार परिषदेत ही महत्त्वपूर्ण माहिती दिली. त्यांच्या या विधानामुळे दोन्ही देशांमधील आर्थिक आणि सामरिक संबंध अधिक दृढ होण्याचे संकेत मिळत आहेत. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी नुकतेच 'भारतासोबतचा व्यापार करार जवळपास तयार आहे,' असे विधान केले होते. यावर बोलताना लेविट म्हणाल्या, "हो, अध्यक्षांनी मागच्या आठवड्यात असंच म्हटलं होतं आणि ते खरं आहे. मी नुकतीच वाणिज्य सचिवांशी याबाबत चर्चा केली आहे. ते ओव्हल ऑफिसमध्ये अध्यक्षांसोबत होते. हे करार अंतिम टप्प्यात आहेत आणि भारतासंदर्भात लवकरच घोषणा होणार आहे.”
इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील चीनच्या वाढत्या प्रभावाविषयी विचारले असता, लेविट यांनी भारताच्या भूमिकेचे महत्त्व अधोरेखित केले. त्या म्हणाल्या, "या क्षेत्रात भारत आमचा एक अत्यंत महत्त्वाचा आणि धोरणात्मक सहकारी आहे. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि पंतप्रधान मोदी यांची मैत्री खूप घट्ट आहे आणि ती भविष्यातही अशीच राहील."
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना नवी दिल्लीत होणाऱ्या 'क्वाड' शिखर परिषदेसाठी आमंत्रित केले आहे. हे निमंत्रण ट्रम्प यांनी स्वीकारले असून, "मी भारत दौऱ्यासाठी खूप उत्सुक आहे," असे त्यांनी म्हटले आहे. भारतीय परराष्ट्र मंत्रालयानेही या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
एकंदरीत, व्यापार कराराची शक्यता आणि क्वाड परिषदेसाठी ट्रम्प यांचे भारताला येण्याचे आश्वासन, या दोन्ही घडामोडींमुळे भारत-अमेरिका संबंध अधिक दृढ होण्याचे संकेत मिळत आहेत. या करारामुळे दोन्ही देशांच्या आर्थिक संबंधांना नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.