

Pahalgam attack mastermind Saifullah Kasuri
नवी दिल्ली : लष्कर-ए-तैयबाच्या एका वरिष्ठ नेत्याने पाकिस्तानी लष्कराचे या दहशतवादी संघटनेसोबत असलेले थेट संबंध उघड केले आहेत. पाकिस्तानी लष्कर आपल्याला त्यांच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी नियमितपणे निमंत्रणे पाठवते आणि शहीद सैनिकांच्या अंत्यविधीचे नेतृत्व करण्यासाठी बोलावते, असे या नेत्याने म्हटले आहे.
हाफिज सईदच्या संघटनेचा प्रमुख आणि पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड सैफुल्ला कसूरी याने पाकिस्तानमधील एका शाळेत आयोजित कार्यक्रमात मुलांना संबोधित करताना हे विधान केले. यावेळी त्याने "भारत मला घाबरतो" असा दावा केला.
सध्या व्हायरल होत असलेल्या एका जुन्या व्हिडिओमध्ये कसूरी म्हणत आहे की, "पाकिस्तानचे लष्कर मला रीतसर निमंत्रण पाठवून बोलावते. त्यांच्या सैनिकांच्या अंत्यविधीच्या प्रार्थनेचे नेतृत्व करण्यासाठी मला निमंत्रित केले जाते."
कसूरीच्या या विधानामुळे दहशतवादी गटांविरुद्ध कारवाई करत असल्याच्या पाकिस्तान सरकारच्या जागतिक दाव्यांमधील खोटेपणा उघड झाला आहे. त्याचे हे सार्वजनिक कबुलीजबाब पाकिस्तानी लष्कर आणि बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनांमधील घनिष्ठ संबंध आणि सहकार्य स्पष्टपणे दर्शवतात.
यापूर्वी, भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर' मुळे पाकिस्तानमधील दहशतवादी पायाभूत सुविधांचे नुकसान झाल्याचे मान्य करताना सैफुल्लाने म्हटले होते की, "दहशतवादी तळांना लक्ष्य करून भारताने चूक केली आहे." तसेच, काश्मीरवरील आपला हेतू स्पष्ट करताना त्याने जाहीर केले की, ही संघटना "काश्मीर मिशनपासून कधीही मागे हटणार नाही."
एका रॅलीमध्ये बोलताना कसूरीने असेही म्हटले होते की, "पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाईंड म्हणून आरोप झाल्यामुळे मी आता जगभर प्रसिद्ध झालो आहे."