

नाशिक : पुण्यातील व्यापाऱ्यांपाठोपाठ नाशिकमधील व्यापाऱ्यांनीही पाकिस्तानची पाठराखण करणाऱ्यांविरोधात संताप व्यक्त करत तुर्कीमधून येणाऱ्या सफरचंदांवर बहिष्कार टाकला आहे. त्याऐवजी त्यांनी अमेरिका, न्यूझीलंड आणि इराण येथून सफरचंद मागवण्याचा निर्णय घेतला आहे.
पाकपुरस्कृत दहशतवाद्यांनी पहेलगाम येथे २६ निरपराध भारतीय नागरिकांची हत्या केल्यानंतर 'ऑपरेशन सिंदूर' राबवून भारताने पाकमधील दहशतवादी स्थळ नष्ट केले. त्यानंतर कुरापतखोर पाकिस्तानने भारताच्या सरहद्दीवर केलेले हल्ले भारतीय सैन्याने परतवून लावत पाकला धडा शिकवला. या तणावाच्या क्षणी जगातील अनेक राष्ट्रांनी भारताची साथ दिली. मात्र, तुर्की आणि चीनने कुरापती पाकिस्तानची तळी उचलत त्यांना पाठिंबा दिला. याच पार्श्वभूमीवर पुण्यातील फळव्यापाऱ्यांनी 'बॅन तुर्की' मोहीम उघडली. त्याच पार्श्वभूमीवर नाशिककरांनीही राष्ट्र प्रथम या भावनेतून तुर्की आणि चीन येथील फळ मालावर बहिष्कार टाकण्याचा सोमवारी (दि. १२) निर्णय घेतला आहे.
शहरातील फळ दुकानदारांनी तुर्की आणि चीनमधून आलेल्या फळांवर बहिष्कार टाकत त्यांची विक्री बंद केली आहे. काही विक्रेत्यांकडे पूर्वी मागवलेली तुर्की फळे विक्रीस होती, मात्र यापुढे ती विक्रीस ठेवणार नसल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. नागरिकांनीही या देशांतील फळांना समर्थन न दर्शवता बहिष्कारात सहभाग घेतला.
आम्ही सैन्य आणि देशासोबत आहोत. तुर्कीने पाकला पाठिंबा दिला. त्यामुळे व्यापाऱ्यांनी तुर्कीहून माल मागवूच नये, ही आमची भूमिका आहे. आम्ही यापुढे तुर्कीची सफरचंद, चीनचा कुठलाही माल विक्रीसाठी ठेवणार नाही.
नानाजी भदाणे, फळ विक्रेते
अन्य देशांपेक्षा तुर्की येथील सफरचंद ३०० ते ३३० रुपये किलो इतके महाग असते. त्यामुळे तशीही नाशिकमध्ये त्याला मागणी कमीच आहे. या फळांची मागणी बंद करणार आहोत. चिनी संत्रीही यापुढे मागवणार नाही.
संगम भारत, घाऊक फळ व्यापारी
तुर्कस्तानचे सफरचंद बाजारात आहे, हे कळाले. यापुढे तुर्कीसह चीन येथील फळे आणि इतर कुठल्याही मालाची खरेदी करणार नाही असा आमच्या कॉलनीतील मित्र परिवाराने निर्धार केला आहे.
निखिल पाटील, नागरिक