

India Pakistan UN
नवी दिल्ली : संयुक्त राष्ट्र महासभेत पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी केलेल्या जम्मू-काश्मीरविषयक वक्तव्याला भारताने ‘राइट टू रिप्लाय’अंतर्गत जोरदार प्रत्युत्तर दिले. संयुक्त राष्ट्रांमधील भारताच्या स्थायी मिशनच्या प्रथम सचिव पेटल गहलोत यांनी पाकिस्तानवर दहशतवाद, लष्करी हस्तक्षेप, अल्पसंख्याकांवरील कथित अत्याचार आणि जम्मू-काश्मीरच्या मुद्द्यावरून जोरदार टीका केली. पाकिस्तानने भारताच्या केंद्रशासित प्रदेश जम्मू-काश्मीरऐवजी पाकिस्तानच्या ताब्यातील काश्मीर (पीओके) मधील परिस्थितीची चिंता करावी, असे त्यांनी सुनावले.
पाकिस्तानच्या पंतप्रधानांचे वक्तव्य बेताल असल्याचे सांगत पेटल गहलोत यांनी ९/११च्या दहशतवादी हल्ल्याचा संदर्भ दिला. या हल्ल्याचा सूत्रधार ओसामा बिन लादेन हा पाकिस्तानमधील लष्कराच्या प्रमुख प्रशिक्षण अकादमीच्या अगदी जवळ राहत होता, याची आठवण त्यांनी करून दिली. “हीच ती लष्करी व्यवस्था आहे, जिची पाकिस्तानच्या प्रतिनिधींनी आज आमच्यासमोर इतकी स्तुती केली,” असा टोला गहलोत यांनी लगावला. पाकिस्तानमधील सरकारवरही त्यांनी निशाणा साधत ‘फॉर्म ४७ सरकार’ या पाकिस्तानात वापरल्या जाणाऱ्या संज्ञेचा उल्लेख केला.
‘फॉर्म ४७ सरकार’ ही संज्ञा २०२४च्या पाकिस्तानातील निवडणुकांनंतर विरोधकांकडून वापरली गेली. निवडणुकीत गैरप्रकार करून सरकार स्थापन झाल्याचा विरोधकांचा आरोप होता. पाकिस्तान निवडणूक आयोगाकडून निवडणूक निकाल संकलित करण्यासाठी फॉर्म ४७ तयार केला जातो. मतदान केंद्रांवरील फॉर्म ४५च्या आधारे हा निकाल तयार केला जातो. २०२४च्या निवडणुकीनंतर फॉर्म ४५मध्ये फेरफार करून फॉर्म ४७मध्ये बदल करण्यात आल्याचा आरोप विरोधकांनी केला होता.
पाकिस्तानच्या लोकशाही व्यवस्थेवरही गहलोत यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. स्वतःच्याच नागरिकांपासून सुरक्षेसाठी राजधानीला लष्करी छावणीचे स्वरूप देणारा देश लोकशाही आणि मानवाधिकारांबाबत उपदेश करत असल्याची टीका त्यांनी केली. पाकिस्तानमधील सत्ताव्यवस्थेचे वर्णन करताना त्यांनी ती “लष्कराचे, लष्कराकडून आणि लष्करासाठी चालणारे शासन” असल्याचे म्हटले. सत्तेवर येणारे चेहरे बदलत असले तरी प्रत्यक्ष निर्णय कोण घेतो, याबाबत कोणताही संभ्रम नसावा, असे त्यांनी सांगितले.
पाकिस्तानच्या २७व्या घटनादुरुस्तीचा आणि लष्करप्रमुखांना आजीवन संरक्षण देण्याच्या तरतुदीचा संदर्भ देत त्यांनी देशातील प्रत्यक्ष सत्ताकेंद्र कोणते आहे, हे अधिक स्पष्ट होत असल्याचा दावा केला.
धार्मिक असहिष्णुता आणि मानवाधिकारांबाबत पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या वक्तव्यांवरही गहलोत यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली. कट्टरता आणि द्वेषाचा दीर्घ इतिहास असल्याचा आरोप असलेल्या सरकारकडून अशा प्रकारची वक्तव्ये केली जात असल्याचे त्यांनी म्हटले. “दिवसा सुरक्षा व्यवस्था कायम ठेवण्याचा दावा केला जातो, तर रात्री प्रत्यक्षात दहशतवादी कारवाया केल्या जातात,” अशा शब्दांत त्यांनी पाकिस्तानवर टीका केली. पाकिस्तानातील अल्पसंख्याकांच्या स्थितीचा उल्लेख करताना जगाला तेथील परिस्थितीची माहिती असल्याचे त्यांनी सांगितले. धार्मिक असहिष्णुतेबाबतचे पोकळ उपदेश जगाची दिशाभूल करू शकत नाहीत, असेही गहलोत म्हणाल्या.
पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी आपल्या भाषणात जम्मू-काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला होता. त्याला प्रत्युत्तर देताना गहलोत यांनी जम्मू-काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग असल्याचे स्पष्ट केले. “भारतीय संघराज्यातील जम्मू-काश्मीर हा माझ्या देशाचा अविभाज्य आणि अखंड भाग आहे आणि तो कायम राहील,” असे त्यांनी ठामपणे सांगितले. त्याचवेळी पाकिस्तानच्या ताब्यातील जम्मू-काश्मीरमधील परिस्थितीचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला. पाकिस्तानने तेथील नागरिकांच्या परिस्थितीकडे लक्ष द्यावे, असे त्यांनी म्हटले.
“जर आपल्याला काश्मीरबाबत चर्चा करायचीच असेल, तर पाकिस्तानच्या ताब्यातील जम्मू-काश्मीरकडे लक्ष द्या. रावळकोटमधील नागरिकांना विचारा. ते दीर्घकाळापासून मनमानी हत्या, क्रूर हिंसाचार आणि मूलभूत अधिकारांपासून वंचित राहण्याचा सामना करत आहेत,” असा दावा गहलोत यांनी केला.
भारताने आपल्या उत्तरात पाकिस्तानकडून होणाऱ्या सीमापार दहशतवादावर विशेष भर दिला. पाकिस्तान दीर्घकाळापासून सीमापार दहशतवादाला प्रोत्साहन देत असल्याचा आरोप गहलोत यांनी केला. गेल्या वर्षी भारताने दहशतवाद्यांना कुठेही पळून जाऊन लपता येणार नाही, हे दाखवून दिल्याचेही त्यांनी सांगितले. “दहशतवादापासून स्वतःचे संरक्षण करण्याच्या आमच्या अधिकाराचा वापर केला जाईल आणि तो सुरूच राहील. पाकिस्तानकडून होणाऱ्या दहशतवादाचे परिणाम त्याला भोगावे लागतील,” असे गहलोत यांनी स्पष्ट केले.
आपल्या उत्तराच्या अखेरीस गहलोत यांनी पाकिस्तानवर खोटेपणा आणि दुटप्पीपणाचा आरोप केला. संयुक्त राष्ट्र महासभेने पाकिस्तानच्या धोरणांकडे त्याच्या प्रतिनिधींकडून मांडल्या जाणाऱ्या स्वरूपात नव्हे, तर त्यांच्या वास्तविक स्वरूपात पाहावे, असे त्यांनी म्हटले. “खोटे वर्षानुवर्षे सांगितल्याने ते सत्य ठरत नाही. पाकिस्तानचा दहशतवाद, फसवणूक आणि दुटप्पीपणा ना त्याच्यासाठी, ना जगासाठी फायदेशीर ठरणार आहे,” असे त्यांनी सुनावले.