

Pakistan Army Lt. Colonel Ahmed Sharif Choudhary
नवी दिल्ली: भारताच्या पाकिस्तानविरुद्धच्या दहशतवादविरोधी लढाईला बदनाम करण्यासाठी पाकिस्तानच्या लष्कराच्या माहिती युद्धाचे नेतृत्व करणारा माणूस म्हणजे लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ चौधरी.
तो पाकिस्तानच्या इंटर-सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्स (ISPR) या लष्करी प्रचार संस्थेचा प्रमुख आहे. पण चौधरी यांच्याबद्दल फार कमी लोकांना हे माहीत आहे की तो ज्याचा पुत्र आहे तो माणूस संयुक्त राष्ट्रांच्या दहशतवाद प्रतिबंधक यादीत "दहशतवादी" म्हणून नोंदलेला आहे.
सध्या लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ चौधरी हा ISPR चा प्रमुख म्हणून आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांसमोर पाकिस्तानला "दहशतवादाचा बळी" म्हणून सादर करतो. पण त्याचे वडीलही दहशतवादीच होते. त्यांनी अणुशास्त्राचा वापर करून अल-कायदाला मदत करण्याचा प्रयत्न केला होता.
अहमद शरीफ यांचा जन्म एका अशा घरात झाला, जिथे अणुविज्ञान आणि इस्लामी कट्टरता यांचं विस्फोटक मिश्रण होतं. त्याच्या वडिलांचा इतिहास पाहता चौधरी याच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित होऊ शकतात.
अहमद शरीफ चौधरी यांचे वडील डॉ. सुलतान बशीरुद्दीन महमूद हे एके काळचे नामांकित अणुशास्त्रज्ञ होते. त्यांनी पाकिस्तानच्या अणु कार्यक्रमात मोठे योगदान दिले.
मात्र, नंतर त्यांनी इस्लामी कट्टरतावादाकडे झुकत जाऊन, अल-कायदा या दहशतवादी संघटनेचा प्रमुख ओसामा बिन लादेनची प्रत्यक्ष भेट घेतली आणि त्याला अण्वस्त्रांची माहिती देण्याचा प्रयत्न केला.
याच कारणामुळे 24 डिसेंबर 2001 रोजी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या अल-कायदा सॅन्क्शन्स कमिटीने त्यांना दहशतवादी घोषित केले.
डॉ. सुलतान महमूद यांनी 2000 मध्ये "उम्मा तामीर-ए-नौ (UTN)" नावाची संस्था स्थापन केली. ही संस्था वरवर सामाजिक कार्य करणारी वाटत होती, पण प्रत्यक्षात ती अफगाणिस्तानातील तालिबान व अल-कायदाला जैविक, रासायनिक व अणुशास्त्राशी संबंधित माहिती पुरवत होती.
डॉ. महमूद यांनी 2001 संयुक्त राष्ट्रांच्या अहवालानुसार, महमूद यांनी अफगाणिस्तानात ओसामा बिन लादेन, तालिबान प्रमुख मुल्ला उमर, अल-कायदा व तालिबानच्या वरिष्ठ नेत्यांशी अनेकदा गुप्त बैठका घेतल्या. त्यांनी या अतिरेक्यांना अणुबॉम्ब बनवण्यासाठी लागणाऱ्या तांत्रिक माहितीबाबत मार्गदर्शन केले.
2001 मध्ये अमेरिकेवर 9/11 चे हल्ले झाल्यानंतर महमूद यांची आणि त्यांच्या सहकाऱ्यांची चौकशी करण्यात आली. अमेरिकन एफबीआयच्या दबावामुळे, पाकिस्तानच्या ISI ने त्यांना अटक केली. चौकशीत त्यांनी ओसामा बिन लादेनशी झालेल्या बैठकीची कबुली दिली.
संस्थेच्या काबूलमधील कार्यालयांमध्ये केलेल्या तपासणीत अण्वस्त्रांच्या मूलभूत भौतिकशास्त्राशी संबंधित दस्तऐवज सापडले, तसेच राजनैतिक अधिकाऱ्याच्या अपहरणाची योजना दर्शवणारे दस्तऐवजही सापडले होते.
डॉ. महमूद हे अणुशास्त्रज्ञच नव्हे तर इस्लाम आणि विज्ञान यांच्यातील संबंधांवर विचार करणारे लेखक होते. डॉ. महमूद यांचे अंधश्रद्धाळू विचारसुद्धा त्यावेळी चर्चेत आले होते.
त्यांनी लिहिलेल्या लेखांमध्ये त्यांनी "जिन्न" या अदृश्य प्राण्यांमार्फत वीज निर्मिती करता येईल असा दावा केला होता. यामुळे वैज्ञानिक समुदायामध्ये त्यांचा उपहास झाला होता आणि त्यांच्या मानसिक संतुलनावरही शंका व्यक्त केली गेली होती.
अहमद चौधरी ज्या पदावर आहे त्यावरून पाकिस्तानच्या लष्कराची दहशतवादाशी किती जवळीक आहे, हे स्पष्ट होते. त्यांच्या वडिलांचा दहशतवादी इतिहास पाहता चौधरी याचं सध्याचं पद आणि भारताविरुद्धचं प्रचारयुद्ध हे पाकिस्तानच्या दुटप्पी धोरणाचं स्पष्ट उदाहरण म्हणता येईल.