

टोकियो : वृत्तसंस्था
जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा यांच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मियागी प्रांतातील एका प्रमुख सेमीकंडक्टर प्लांटला भेट दिली. दोन्ही देशांनी गंभीर तंत्रज्ञान क्षेत्रात सहकार्य वाढवण्याचा संकल्प केल्यानंतर दुसर्याच दिवशी ही भेट झाली, ज्यामुळे या भागीदारीचे महत्त्व अधोरेखित झाले आहे.
पंतप्रधान मोदी आणि इशिबा यांनी बुलेट ट्रेनने 300 कि.मी.चा प्रवास करून सेंदाई येथील ‘टोकियो इलेक्ट्रॉन मियागी लिमिटेड’ या कंपनीला भेट दिली. भारताची वाढती सेमीकंडक्टर उत्पादन क्षमता आणि जपानचे या क्षेत्रातील कौशल्य यांना एकत्र आणून एक मजबूत पुरवठा साखळी निर्माण करणे हा या भेटीचा मुख्य उद्देश होता. टेल मियागी ही कंपनी भारतात सहकार्य करण्यास उत्सुक असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
या भेटीमुळे दोन्ही देशांना सेमीकंडक्टर पुरवठा साखळी, फॅब्रिकेशन आणि टेस्टिंगमध्ये सहकार्याच्या संधींची प्रत्यक्ष माहिती मिळाली. ही भेट दोन्ही देशांच्या धोरणात्मक भागीदारीला अधोरेखित करते आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आत्मनिर्भर भारताच्या प्रवासाला नवी गती देणारी ठरू शकते.
दोन दिवसांच्या यशस्वी जपान दौर्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशन (डउज) शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी चीनकडे रवाना झाले. जपान दौर्यात दोन्ही देशांमध्ये संरक्षण, गुंतवणूक आणि तंत्रज्ञानासह 13 महत्त्वाचे करार झाले, ज्यामुळे भारत-जपान विशेष सामरिक भागीदारीला नवी दिशा मिळाली आहे.
पंतप्रधान मोदी आणि त्यांचे जपानी समकक्ष शिगेरू इशिबा यांच्यातील शिखर चर्चेनंतर अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या. जपानने भारतात पुढील 10 वर्षांत 10 ट्रिलियन येन (सुमारे 60,000 कोटी रुपये) गुंतवणुकीचे लक्ष्य ठेवले आहे. याशिवाय, दोन्ही देशांनी संरक्षण संबंधांसाठी एक आराखडा आणि आर्थिक भागीदारी वाढवण्यासाठी 10 वर्षांचा रोडमॅप निश्चित केला आहे. सेमीकंडक्टर, स्वच्छ ऊर्जा, दूरसंचार आणि चांद्रयान-5 यासारख्या संयुक्त चंद्रमोहिमेवरही महत्त्वपूर्ण करार झाले. हा जपान दौरा फलदायी ठरला, असे पंतप्रधानांनी ‘एक्स’ पोस्टमध्ये म्हटले.