

लठ्ठपणा ही आता फक्त एका व्यक्तीची समस्या राहिलेली नाही, तर ती संपूर्ण देशासाठी एक मोठी आरोग्य अडचण बनली आहे. आपल्या देशात दर तीन व्यक्तींपैकी एकाला जास्त वजनाचा त्रास आहे. लठ्ठपणा हा शत्रूसारखा आहे, जो हळूहळू आपल्या शरीरात मधुमेह (शुगर) आणि हृदयाच्या गंभीर आजारांसारख्या मोठ्या समस्या निर्माण करतो. या समस्येचे गांभीर्य ओळखून स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेकदा चिंता व्यक्त केली आहे.
नुकतेच स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात लाल किल्ल्यावरून त्यांनी पुन्हा एकदा या वाढत्या धोक्याकडे देशाचे लक्ष वेधले. "देशातील प्रत्येक तिसरी व्यक्ती लठ्ठपणाची शिकार आहे," असे सांगत त्यांनी या समस्येवर नियंत्रण मिळवण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगीतले.
लठ्ठपणाला अनेकदा केवळ दिसण्यापुरते मर्यादित समजले जाते, पण वास्तव त्याहून अधिक भयावह आहे. हा आजार हृदयरोग, उच्च रक्तदाब, मधुमेह (Diabetes), वाढलेले कोलेस्ट्रॉल आणि अगदी कर्करोगासारख्या जीवघेण्या आजारांचे मूळ आहे. त्यामुळे यावर वेळीच नियंत्रण मिळवणे अत्यंत आवश्यक आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) अहवालानुसार, भारतात लठ्ठपणाचे प्रमाण चिंताजनक पातळीवर पोहोचले आहे. विशेषतः शहरी भाग आणि महिलांमध्ये ही समस्या अधिक प्रमाणात दिसून येत आहे. वाढत्या वयानुसार लठ्ठपणाचा धोकाही वाढत आहे. यामागील प्रमुख कारणे आपल्या बदलत्या जीवनशैलीत दडली आहेत:
बैठी जीवनशैली (Sedentary Lifestyle): तासन्तास डेस्कवर काम करणे, शारीरिक हालचालींचा अभाव आणि व्यायामाकडे होणारे दुर्लक्ष हे लठ्ठपणाचे सर्वात मोठे कारण आहे.
असंतुलित आहार: जंक फूड, प्रक्रिया केलेले पदार्थ (Processed Food) आणि तेलकट पदार्थांचे अतिसेवन.
अपुरी झोप: इंटरनेट आणि स्मार्टफोनच्या अतिवापरामुळे लोकांची झोप पूर्ण होत नाही, ज्यामुळे हार्मोन्सचे संतुलन बिघडते आणि भूक वाढते.
वाढता ताणतणाव: तणावामुळे खाण्याच्या सवयी बिघडतात, जे थेट वजनावर परिणाम करते.
पंतप्रधान मोदी आरोग्याबाबत लोकांना सातत्याने जागरूक करत असतात. त्यांनी यापूर्वीही लोकांना आपल्या आहारात तेलाचा वापर १०% कमी करण्याचे आणि निरोगी जीवनशैलीचा अवलंब करण्याचे आवाहन केले होते. लठ्ठपणाविरुद्धची लढाई ही केवळ वैयक्तिक नसून ती एक राष्ट्रीय मोहीम बनली पाहिजे, असा संदेश त्यांनी दिला आहे.
लठ्ठपणावर नियंत्रण मिळवणे अवघड असले तरी अशक्य नाही. आपल्या जीवनशैलीत काही सोपे पण महत्त्वाचे बदल करून आपण या समस्येवर मात करू शकतो:
संतुलित आहार घ्या: आपल्या आहारात प्रथिने (Proteins), फळे, हिरव्या भाज्या आणि संपूर्ण धान्यांचा समावेश करा. आपण काय खातो आणि त्यातून किती पोषण मिळते, याबद्दल जागरूक रहा.
अति खाणे टाळा: एकाच वेळी खूप जास्त खाण्याऐवजी दिवसातून 4-5 वेळा थोड्या-थोड्या प्रमाणात खा. यामुळे शरीरातील अतिरिक्त ऊर्जा चरबीच्या रूपात साठणार नाही.
नियमित व्यायाम करा: जागतिक आरोग्य संघटनेनुसार, प्रत्येक व्यक्तीने दररोज किमान 30 ते 60 मिनिटे शारीरिक हालचाल (उदा. चालणे, धावणे, योगा) करणे आवश्यक आहे.
पुरेशी झोप घ्या: दररोज रात्री 7-8 तासांची शांत झोप घेणे शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.
तणावमुक्त राहा: तणाव कमी करण्यासाठी ध्यान (Meditation), संगीत किंवा आपल्या आवडीच्या छंदांसाठी वेळ काढा.
लठ्ठपणा हे केवळ एका व्यक्तीचे नाही, तर संपूर्ण समाजाचे आरोग्य धोक्यात आणणारे संकट आहे. यावर मात करण्यासाठी वैयक्तिक प्रयत्नांसोबतच सामाजिक जनजागृतीचीही गरज आहे. निरोगी आहार आणि सक्रिय जीवनशैलीचा अवलंब करून आपण केवळ आपलेच नव्हे, तर एका निरोगी भारताच्या निर्मितीमध्येही योगदान देऊ शकतो.