Trump Putin Alaska Summit
युक्रेन-रशिया यांच्यातील संघर्ष थांबविण्याबाबत अलास्का येथील अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यातील शिखर बैठकीचे भारताने स्वागत केले आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी जारी केलेल्या एका अधिकृत निवेदनात म्हटले आहे, "जगाला हा संघर्ष लवकर थांबलेला पाहायचा आहे."
"अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यातील अलास्का येथे झालेल्या शिखर बैठकीचे भारताकडून स्वागत!. शांततेच्या दिशेने त्यांचे नेतृत्व अत्यंत प्रशंसनीय आहे. शिखर बैठकीत झालेल्या प्रगतीचे भारत कौतुक करतो. पुढे जाण्यासाठीचा मार्ग केवळ संवाद आणि मुत्सद्देगिरीतून निघू शकतो. जगाला युक्रेनमधील संघर्ष लवकर थांबलेला पाहायचा आहे."
शुक्रवारी ट्रम्प आणि पुतीन यांच्यातील अलास्का येथील बैठक जवळपास तीन तास चालली. त्यानंतर संयुक्त पत्रकार परिषद लवकर आटोपती घेतली. यावेळी कोणताही करार झाल्याचे जाहीर करण्यात आले नाही. उभय नेत्यांनी पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरेही दिली नाहीत.
ही बैठक "खूपच फलदायी" ठरली, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. यात अनेक करार झाले असल्याचे सांगत त्यांनी त्यांच्या नेहमीच्या भूमिकेचा पुनरुच्चार केला. "करार होईपर्यंत कोणताही करार झालेला नसतो," असे त्यांनी म्हटले.
अमेरिकेने भारताच्या निर्यातीवर ५० टक्के टॅरिफ लागू केले आहे. ट्रम्प यांच्या या अलिकडच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर, परराष्ट्र मंत्रालयाने ट्रम्प- पुतीन भेटीचे स्वागत करत प्रतिक्रिया दिली. भारताचा रशियासोबत सुरु असलेला तेल व्यापार हे अमेरिकेकडून टॅरिफ वाढवण्याचे प्रमुख कारण आहे.
पुतीन यांच्यासोबत झालेल्या चर्चेबाबत विचारले असता, ट्रम्प यांनी भारताच्या भूमिकेवर प्रकाश टाकला. ते म्हणाले, "त्यांनी एक तेल खरेदीदार गमावला, तो म्हणजेच भारत. जो सुमारे ४० टक्के तेल खरेदी करत होता. चीनकडून बरेच काही केले जात आहे हे तुम्हाला माहित आहेच."
"आणि जर मी अतिरिक्त निर्बंध लादले तर ते त्यांच्या दृष्टिकोनातून ते नुकसानीचे ठरेल. जर मला ते करण्याची वेळ आली तर मी ते करेनच, कदाचित असेही होईल की मला ते करावे लागणार नाही," असेही त्यांनी स्पष्ट केले.