

Trump Putin Meet
दिल्ली : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या अलास्का येथे झालेल्या बहुचर्चित भेटीत युक्रेन युद्ध, परस्पर संबंध आणि सहकार्याच्या अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. दोन्ही नेत्यांची संयुक्त पत्रकार परिषद फक्त १२ मिनिटे चालली ज्यामध्ये त्यांनी फक्त पत्रकारांना संबोधित केले आणि कोणत्याही प्रश्नांची उत्तरे दिली नाहीत.
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष सहसा यजमान म्हणून प्रथम बोलतात, मात्र या परंपरेला छेद देत पुतीन यांनी संयुक्त पत्रकार परिषदेची सुरुवात केली. त्यांनी अमेरिका-रशिया संबंधांच्या स्थितीवर भाष्य करताना म्हटले की, "हे संबंध शीतयुद्धानंतरच्या सर्वात खालच्या पातळीवर पोहोचले आहेत." संघर्षाकडून संवादाकडे वळण्याची गरज असल्याचे सांगत पुतीन म्हणाले, "कधी ना कधी, आपल्याला ही परिस्थिती सुधारावीच लागेल." त्यांनी या भेटीला "खूप आधीच व्हायला हवी होती" असे म्हटले. पुतीन यांच्या मते, त्यांच्या खासगी चर्चेचा मुख्य विषय युक्रेनमधील परिस्थिती हा होता. "युक्रेनियन आणि युरोपियन देश शांतता प्रक्रियेत अडथळा आणणार नाहीत," अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
पुतीन यांनी ट्रम्प यांच्या "सकारात्मक भूमिकेबद्दल" त्यांचे आभार मानले आणि दोन्ही बाजूंनी प्रत्यक्ष परिणामांवर लक्ष केंद्रित करण्याची गरज असल्याचे नमूद केले. "ट्रम्प यांना आपल्या देशाच्या समृद्धीची काळजी आहे, पण रशियाचे स्वतःचे हितसंबंध आहेत हेही ते समजून घेतात," असे सांगत पुतीन यांनी हा संवाद परस्पर आदर आणि वास्तवावर आधारित असल्याचे स्पष्ट केले.
पुतिन यांनी असेही नमूद केले की आर्क्टिक क्षेत्रात रशिया-अमेरिका सहकार्य शक्य आहे आणि व्यापार-गुंतवणुकीच्या मोठ्या संधी आहेत. त्यांनी दावा केला की २०२२ मध्ये जर ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष असते, तर हे युद्ध कधीच झाले नसते. चर्चेदरम्यान ट्रम्प यांच्या "मित्रत्वाच्या आणि विश्वासार्ह" भूमिकेबद्दल पुतिन यांनी त्यांचे आभार मानले.
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी आपल्या भाषणाची सुरुवात सकारात्मक सुरात केली. त्यांनी ही बैठक "अत्यंत फलदायी" असल्याचे सांगत अनेक मुद्द्यांवर एकमत झाल्याचे नमूद केले. मात्र, ट्रम्प यांनी हेही मान्य केले की अनेक मोठे मुद्दे अद्यापही प्रलंबित आहेत. "काही मोठे मुद्दे आहेत, जिथे आम्ही अजून अंतिम निर्णयापर्यंत पोहोचलो नाही, पण आम्ही काही प्रमाणात प्रगती केली आहे," असे ते म्हणाले. आपला प्रसिद्ध वाटाघाटीचा मंत्र पुन्हा एकदा सांगताना ट्रम्प म्हणाले, "करार होईपर्यंत कोणताही करार नाही."
त्यांनी सांगितले की ते नाटो (NATO) नेत्यांना आणि इतर महत्त्वाच्या व्यक्तींना फोन करून बैठकीतील माहिती देणार आहेत. युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनाही याबद्दल माहिती दिली जाईल, असे ते म्हणाले. "अंतिम निर्णय त्यांचा असेल. मार्को, स्टीव्ह आणि ट्रम्प प्रशासनातील इतर महान व्यक्तींनी जे ठरवले आहे, त्यावर त्यांना सहमत व्हावे लागेल," असे सांगत ट्रम्प यांनी या प्रक्रियेत इतरही भागीदार असल्याचे संकेत दिले.
पत्रकार परिषदेत एक मनोरंजक किस्सा घडला. ट्रम्प यांनी पुतिनला "लवकरच भेटू" असे म्हटले. त्यावर पुतिन यांनी इंग्रजीत उत्तर दिले – “नेक्स्ट टाइम इन मॉस्को” म्हणजेच पुढील चर्चा मॉस्कोमध्ये होईल. यावर ट्रम्प हसत म्हणाले – “ओह, दॅट्स अॅन इंटरेस्टिंग वन” म्हणजेच "वा, हे तर मनोरंजक आहे!"