

Great Pyramid of Giza construction : अत्याधुनिक यंत्रसामग्री किंवा कोणतेही आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध नसताना, हजारो वर्षांपूर्वी प्राचीन इजिप्शियन लोकांनी 'गिझाचा ग्रेट पिरॅमिड' कसा उभारला? या प्रश्नाने अनेक दशकांपासून जगातील इतिहासकार आणि संशोधकांना चक्रावून सोडले होते. मात्र, आता ग्रेट पिरॅमिड ऑफ गिझाच्या बांधकामाबाबत दीर्घकाळापासून मान्य असलेल्या समजुतींना नव्या संशोधनाने आव्हान दिले आहे, या रहस्याचे उत्तर कदाचित पिरॅमिडच्या रचनेतच दडलेले होते, असा दावा करण्यात आला आहे.
इजिप्तचा सर्वात मोठा पिरॅमिड हा इजिप्शियन फराओ खुफूची कबर आहे. सुमारे इ.स.पूर्व २५६० च्या सुमारास इजिप्तचा फराओ खुफू याची समाधी म्हणून बांधण्यात आलेल्या या सर्वात मोठ्या पिरॅमिडमध्ये अंदाजे २३ लाख दगडी शिळा वापरण्यात आल्या आहेत. प्रत्येक शिळेचे वजन २.५ ते १५ टनांपर्यंत आहे. खुफूच्या २७ वर्षांच्या कारकीर्दीत हे बांधकाम पूर्ण झाले असे मानले जाते. त्यानुसार, सरासरी दर तीन मिनिटांनी एक दगडी शिळा योग्य ठिकाणी बसवावी लागली असती. त्यामुळे एवढ्या कमी कालावधीत इतकी विशाल वास्तू कशी उभारली गेली, यावर अनेक वर्षांपासून चर्चा सुरू आहे.
काही संशोधकांनी असे सुचवले आहे की, पिरॅमिडच्या उभारणीसाठी बाह्य उतारांचा वापर केला गेला होता; परंतु अशा उतारांसाठी स्वतःच प्रचंड प्रमाणात सामग्रीची आवश्यकता भासली असती, आणि त्यांचा कोणताही स्पष्ट पुरातत्वीय पुरावा कधीही सापडलेला नाही. दुसऱ्या एका कल्पनेनुसार, पिरॅमिडमध्ये एकच उतार बांधला गेला होता, जो रचनेतून सर्पिलाकारात वर जात होता आणि बांधकाम जसजसे पुढे सरकत गेले तसतसे वरून खाली भरला गेला.
प्रसिद्ध 'नेचर' (Nature) या नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या संशोधनानुसार, संशोधक व्हिसेंटे लुईस रोसेल रोइग यांनी यामागचे गणितीय पुरावे सादर केले आहेत. त्यांच्या गणितीय विश्लेषणानुसार, पिरॅमिडच्या आत वेटोळ्यासारख्या व आतल्या बाजूला खोलगट अशा चार उतारमार्गांचा (रॅम्प्स) अत्यंत कल्पक वापर करून प्रचंड वजनाचे अवाढव्य दगड वर नेण्यात आले. तसेच हे दगड योग्य ठिकाणी बसवण्यासाठी प्राचीन लोकांनी सर्पिलाकार व खाच असलेल्या उतारांच्या एका कल्पक प्रणालीचा वापर केला होता, असा दावा रोइग यांनी आपल्या संशोधनात केला आहे.
रोइगच्या गणितीय मॉडेलिंगनुसार, केवळ एकच उतार वापरून पिरॅमिड पूर्ण करण्यासाठी जवळजवळ अर्धे शतक लागले असते. मात्र या नवीन संशोधनावर त्यांनी असा दावा केला आहे की चार स्वतंत्र, आतल्या बाजूला खोलगट सर्पिल रॅम्प्स पिरॅमिडभोवती एकाच वेळी वापरण्यात आले. प्रत्येक रॅम्पची सुरुवात पिरॅमिडच्या तळाजवळील वेगवेगळ्या ठिकाणांपासून होत होती. मुख्य बांधकाम पूर्ण झाल्यानंतर हे रॅम्प्स भरून टाकण्यात आले असावेत. त्यांच्या संगणकीय मॉडेलनुसार, या पद्धतीमुळे पिरॅमिडचे बांधकाम २७ वर्षांत पूर्ण करणे शक्य झाले असते.
लिव्हरपूल विद्यापीठातील इजिप्तशास्त्राचे तज्ज्ञ डॉ. रोलँड एनमार्च यांनी या संशोधनाबाबत प्रतिक्रिया देताना सांगितले, "पिरॅमिडच्या बांधकामाबाबत हे स्पष्टीकरण निश्चितच रंजक आहे. मात्र, या दाव्याची पुष्टी करण्यासाठी आणखी पुरावे आणि संरचनेतील अपेक्षित असामान्य वैशिष्ट्यांचे अधिक स्कॅन करावे लागतील. तरीही हा सिद्धांत अतिशय विश्वासार्ह वाटतो. ग्रेट पिरॅमिड ऑफ गिझा हा ना पहिला पिरॅमिड होता, ना शेवटचा. त्यामुळे या संशोधनातून इतर पिरॅमिड्सच्या उभारणीविषयीही महत्त्वाचे संकेत मिळू शकतात."