

कैरो ः सुदानमधील ‘टोम्बोस’ या पुरातत्त्व स्थळी झालेल्या उत्खननातून असे आढळले आहे की प्राचीन इजिप्त आणि सुदानमधील पिरॅमिडस् फक्त उच्चवर्गीयांसाठी नव्हते, तर श्रमिकवर्गातील लोकही त्यामध्ये दफन केले जात असत. जर्नल ऑफ अँथ—ोपोलॉजिकल आर्किओलॉजीच्या अंकात प्रकाशित झालेल्या एका संशोधनानुसार, ‘आतापर्यंत पिरॅमिडस् उच्चवर्गीयांची अंतिम विश्रांती स्थळे मानले जात होते, मात्र आमच्या अभ्यासानुसार, यात श्रमिकवर्गातील लोकही दफन करण्यात आले असावेत,‘ असे पुरातत्त्वशास्त्रज्ञांनी नमूद केले आहे.
‘टोम्बोस’ हे नाईल नदीच्या तिसर्या कॅटरॅक्टजवळ (जलप्रपात) सुदानमध्ये वसलेले एक प्राचीन शहर होते. प्राचीन काळात हे क्षेत्र नुबिया किंवा कुश म्हणून ओळखले जात असे. सुमारे इ.स.पू. 1400 मध्ये इजिप्तच्या सैन्याने हे क्षेत्र जिंकले आणि तेथील नियंत्रणासाठी ‘टोम्बोस’ ही वसाहत स्थापन केली. या ठिकाणी उच्चवर्गीयांच्या समाधींवर लहान पिरॅमिडस् उभारण्यात आले होते. नवीन अभ्यासामध्ये सुमारे 110 मानवी सांगाडे तपासण्यात आले. संशोधकांनी हाडांच्या संरचनेचा अभ्यास करून लोकांनी किती कष्टाचे काम केले होते, याचा अंदाज घेतला. अभ्यासकांनी सांगाड्यांच्या स्नायू आणि लिगामेंटस्च्या (सांध्यांमधील बंध) जोडणीच्या ठिकाणी झालेल्या बदलांचे निरीक्षण केले. अधिक श्रम करणार्या व्यक्तींच्या हाडांवर विशिष्ट प्रकारचे खाचा आणि उंचवटे दिसतात. ज्यांच्या हाडांवर असे बदल कमी प्रमाणात आढळले, ते उच्चवर्गीय अधिकारी किंवा नोकरशाहीतील लोक असावेत. तर ज्या सांगाड्यांमध्ये अधिक प्रमाणात हे बदल दिसून आले, त्या व्यक्तींनी खूप मेहनतीचे काम केले असावे.
संशोधकांच्या मते, पिरॅमिडस्मध्ये केवळ उच्चवर्गीय नव्हते, तर त्यांच्या सोबत श्रमिकवर्गीयांचाही समावेश होता. यामागे काही शक्यता विचारात घेतल्या गेल्या
1. सामाजिक स्तर राखण्यासाठी उच्चवर्गीयांनी ही प्रथा सुरू केली असावी, ज्यामुळे त्यांना मृत्यूनंतरही त्यांचे सेवक मिळावेत.
2. निम्नवर्गीय लोक स्वतःहून उच्चवर्गीयांच्या जवळ दफन होण्याची इच्छा बाळगत असावेत, जेणेकरून त्यांना सामाजिक प्रतिष्ठा किंवा धार्मिक सुरक्षा मिळेल. संशोधनाच्या प्रमुख लेखक व नेदरलँडस्मधील लिडेन युनिव्हर्सिटीतील संशोधिका सारा श्रेडर यांनी सांगितले की, ‘उच्चवर्गीयांनी ही प्रथा चालू ठेवली असावी, ज्यामुळे मृत्यूनंतरही सामाजिक संरचना कायम राहावी.