

कैरो (इजिप्त) : इजिप्तमधील ग्रेट पिरॅमिड नेमका कशासाठी बांधला गेला होता? या शतकानुशतके जुन्या वादाला एका नवीन संशोधनाने पुन्हा तोंड फोडले आहे. मुख्य प्रवाहातील इतिहासकार आणि पुरातत्त्वशास्त्रज्ञ या पिरॅमिडला इजिप्तच्या राजाची (फॅरो खुफू) कबर मानतात. मात्र, नुकत्याच समोर आलेल्या एका संशोधनात असा खळबळजनक दावा करण्यात आला आहे की, हा पिरॅमिड म्हणजे प्रत्यक्षात अंतराळात संदेश पाठवणारी एक अत्याधुनिक यंत्रणा म्हणजेच प्लेनेटरी बिकन (अंतराळात किंवा ग्रहांवर मार्ग दाखवण्यासाठी किंवा संदेश पाठवण्यासाठी वापरले जाणारे साधन) असू शकते.
इराणच्या शाहिद बेहेश्ती युनिव्हर्सिटीमधील लेझर अँड प्लाझ्मा इन्स्टिट्यूटचे संशोधक जलाल जाफारी यांनी हा शोधनिबंध मांडला आहे. हा सिद्धांत मुख्यत्वे पिरॅमिडचे भौगोलिक स्थान आणि भौतिकशास्त्रातील नियम यावर आधारित आहे.
प्रकाशाच्या वेगाशी साधर्म्य : गिझाचा ग्रेट पिरॅमिड पृथ्वीवर 29.979234 अंश उत्तर अक्षांशावर स्थित आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, भौतिकशास्त्रात प्रकाशाचा वेग प्रति सेकंद 299,792,458 मीटर (स्पीड ऑफ लाईट) इतका आहे. या दोन्ही आकड्यांमधील पहिले 7 अंक तंतोतंत जुळतात.
हेतू पुरस्सर निवड? : संशोधकांचा असा दावा आहे की, प्राचीन काळी एका प्रगत संस्कृतीने मुद्दाम हे स्थान निवडले असावे, जेणेकरून विश्वातील कोणत्याही प्रगत संस्कृतीला पृथ्वीचे अंतराळातील स्थान गणितीय पद्धतीने ओळखता यावे.
ग्रॅव्हिटेशनल ट्रान्समीटर संकल्पना : या सिद्धांतानुसार, पृथ्वी जेव्हा सूर्याभोवती फिरते, तेव्हा एक विशिष्ट गुरुत्वाकर्षण लहरींचा पॅटर्न (कॅरिअर व्हेव्हज) तयार होतो. पृथ्वीच्या रोजच्या परिवलनामुळे (स्वतःभोवती फिरण्यामुळे) पिरॅमिडचे प्रचंड वजन आणि विशिष्ट कोनातील रचना या गुरुत्वाकर्षण पॅटर्नमध्ये सूक्ष्म बदल (मॉड्युलेट) घडवून आणतात. हा बदल एखाद्या रेडिओ ट्रान्समीटरसारखा काम करतो, जो आंतरतारकीय (इंटरस्टेलर) स्तरावर संदेश पाठवू शकतो. तसेच, गिझा पठारावरील खुफू, खफ्रे आणि मेणकावरे हे तिन्ही पिरॅमिडस् वायव्येकडून आग्नेयेकडे एका अचूक रेषेत आहेत. त्यांच्या बाजू मुख्य दिशांशी (उत्तर-दक्षिण-पूर्व-पश्चिम) अवघ्या 0.06 अंशाच्या अचूकतेने जुळतात. हा अचूकपणा नैसर्गिक गोंधळ (बॅकराऊड नॉईस) कमी करून सिग्नल स्पष्ट करण्यासाठी डिझाईन केला असावा, असा तर्क जाफारी यांनी लावला आहे.
शास्त्रज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञांचा आक्षेप
हा सिद्धांत अत्यंत रंजक असला, तरी वैज्ञानिक वर्तुळातून यावर तीव्र टीका होत आहे. शास्त्रज्ञांनी आक्षेप नोंदवले आहेत. प्रकाशाचा वेग मोजण्यासाठी वापरली जाणारी मीटर आणि सेकंद ही आधुनिक मानके आहेत. प्राचीन इजिप्तमध्ये ही मापन पद्धती अस्तित्वातच नव्हती, त्यामुळे हा आकडा केवळ एक योगायोग असू शकतो. पिरॅमिडसारखी दगडी रचना गुरुत्वाकर्षण लहरी किंवा सिग्नल निर्माण करू शकते, याचा कोणताही ठोस पुरावा किंवा यंत्रणा आधुनिक भौतिकशास्त्रात उपलब्ध नाही. हा शोधनिबंध अजूनही समवयस्क पुनरावलोकनातून गेलेला नाही. त्यामुळे हा सिद्धांत सध्या केवळ एक तर्क मानला जात असला, तरी याने पिरॅमिडच्या रहस्यांमध्ये एका नवीन वादाची भर घातली आहे.