

Ramayana in Pakistan Karachi Theater AI visuals show Modern play Ramayana performance
कराची ः पाकिस्तानातील कराची शहरात हिंदू धर्मातील महान ग्रंथ रामायणवर आधारित एक भव्य आणि आधुनिक रंगमंचीय नाटक सादर केले जात आहे. ‘मौज’ या नाट्यसंस्थेने आयोजित केलेले हे नाटक 11 ते 13 जुलै या कालावधीत कराची आर्ट्स कौन्सिलमध्ये रंगत आहे.
विशेष म्हणजे या नाटकात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) चा वापर करून पारंपरिक कथेला आधुनिकतेची जोड दिली आहे.
या नाटकाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यातील दृष्य सजीव भासत आहेत. झाडांची हालचाल, महालांची भव्यता, आणि जंगलातील शांतता यांसारखी दृश्ये AI च्या सहाय्याने प्रभावीपणे सादर केली जात आहेत. त्यामुळे संपूर्ण नाटकात एक जादूई वातावरण निर्माण होते आणि प्रेक्षक मंत्रमुग्ध होतात.
राम – अश्मल लालवानी
सीता – राणा काजमी
रावण – सम्हान गाजी
दशरथ – आमिर अली
लक्ष्मण – वकास अख्तर
हनुमान – जिबरान खान
कैकेयी – सना तोहा
मंत्री – अली शेर
विशेष म्हणजे, सीतेची भूमिका साकारणाऱ्या राणा काजमी नाटकाच्या निर्मात्या देखील आहेत.
या नाटकाचे दिग्दर्शन योहेश्वर करेरा यांनी केले आहे. त्यांनी सांगितले की, रामायणासारख्या धार्मिक ग्रंथावर आधारित नाटक करणे काही जणांना धाडसी वाटेल, मात्र त्यांना कधीही समाजाकडून विरोध होईल अशी भीती वाटली नाही.
ते म्हणाले, "रामायण माझ्यासाठी नेहमीच प्रेरणादायक राहिली आहे. मला हे महाकाव्य भव्यतेने आणि सौंदर्यपूर्ण रीतीने लोकांसमोर सादर करायचे होते. पाकिस्तानातील समाज सहिष्णू आहे आणि लोकांनी हे नाटक उघड्या मनाने स्वीकारले, याचा मला आनंद आहे."
या नाटकाचे याआधी नोव्हेंबर 2024 मध्ये The Second Floor (T2F) येथे प्रथम सादरीकरण झाले होते. तिथेही प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाल्यानंतर आता कराचीच्या Arts Council मध्ये याचे अधिक भव्य सादरीकरण केले जात आहे.
सादरीकरण, वेशभूषा, प्रकाशयोजना, लाईव्ह संगीत आणि देखाव्याची भव्य सजावट यामुळे ते लक्षवेधी ठरले आहे.
राणा काजमी म्हणाल्या की, "आम्ही जेव्हा रामायण हे नाटक सादर करण्याचा विचार मांडला, तेव्हा मौज थिएटरमधील सगळ्यांनी लगेच होकार दिला. रामायण ही केवळ भारतातच नव्हे, तर जगभरात लोकांच्या मनात घर केलेली कथा आहे. कराचीत ती रंगमंचावर सादर होत आहे आणि लोकांच्या हृदयाला भिडत आहे, याचा अभिमान वाटतो."
पाकिस्तानसारख्या मुस्लिम बहुल देशात रामायणासारख्या हिंदू धर्मग्रंथावर आधारित नाटकाचे खुले मनाने स्वागत होणे हे सहिष्णुतेचे आणि सांस्कृतिक आदानप्रदानाचे सकारात्मक उदाहरण ठरत आहे.